अन्य कैदीच बनले ‘बॉडीगार्ड’ : कोट्यवधी रुपयांचा संरक्षण करार झाल्याची चर्चा

गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले क्लबचे मालक लुथरा बंधूंना कोलवाळ कारागृहात राज्यातील एका कुख्यात गँगस्टरच्या टोळीने संरक्षण (प्रोटेक्शन) दिले आहे. कारागृहात सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांना इतर कैद्यांकडून मारहाण होणार नाही, याची काळजी या गँगने घेतली आहे. यासाठी त्या गँगस्टरने लुथरा बंधूंशी संरक्षण करार केला असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी म्हापसा न्यायालयाने संशयित आरोपी लुथरा बंधूंना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर हणजूण पोलिसांनी संशयितांची कोलवाळ कारागृहात रवानगी केली होती. सध्या दोघेही संशयित कारागृहात आहेत. तत्पूर्वी लुथरा बंधूंना १७ डिसेंबर रोजी थायलंडमधून अटक करून आणले होते. हणजूण पोलीस कोठडीत १२ दिवस काढल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडीसाठी कारागृहात पाठवण्यात आले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या दिवसापासून कारागृहात गँगस्टरच्या टोळीने सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. सध्या कारागृहातील कैद्यांमध्ये काहीजण या टोळीतील आहेत. या कैद्यांमार्फत त्या गँगस्टरने लुथरा बंधूंना संरक्षण दिले आहे. संशयित लुथरा बंधूंचे वास्तव्य असलेल्या कारागृहातील सेलसह कारागृहाच्या आवारात बॉडीगार्डप्रमाणे हे कैदी दोघांनाही संरक्षण देत आहेत.
सकाळ-संध्याकाळ कैद्यांना कारागृहातील त्यांच्या सेलमधून बाहेर काढले जाते. त्यावेळी, तसेच लुथरा बंधूंना वैद्यकीय तपासणी किंवा न्यायालयात हजर राहण्यासाठी कारागृहाच्या आत-बाहेर नेले जाते. त्यावेळी कैद्यांची टोळी लुथरा बंधूंना ठेवलेल्या सेलपासून ते कारागृहाच्या मुख्य फाटकापर्यंत बॉॅडीगार्डप्रमाणे संरक्षण देते.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृह सुरू झाल्यापासून प्रथमच हा कैदी संरक्षणाचा प्रकार सुरू झाला आहे. कारागृहात दाखल केलेल्या कैद्याला त्याच्या सेलपासून फाटकापर्यंत तसेच कारागृहाच्या आवारात खुल्या जागी सोडणाऱ्या कैद्यांचे संरक्षण तुरुंग प्रशासन करत असते. त्यासाठी जेलर (उपअधीक्षका) ते जेल गार्ड (जेल वॉर्डन) हे कर्मचारी नेमलेले असतात. तरीही कारागृहात लुथरा बंधूंना संरक्षण (बॉडीगार्ड) देण्याचा प्रकार खुलेआम सुरू आहे. तुरुंग प्रशासनाला यावर प्रतिबंध घालणे शक्य झालेले नाही.
लुथरा बंधूंसाठी कारागृहातील नियमांना फाटा
कोलवाळ कारागृहात कैद्याची रवानगी झाल्यानंतर त्याला प्रथम अॅडमिशन म्हणजेच क्वारंटाईन सेलमध्ये (विभाग) ठेवले जाते. तिथून अंडरट्रायल, पनिशमेंट, कन्विक्ट, अशा प्रकारच्या विभागात त्याच्या गुन्ह्यांनुसार त्याची पाठवणी केली जाते. न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना प्रथम अॅडमिशन विभागातच ठेवण्याची प्रथा आहे. मात्र ही परंपरा लुथरा बंधूंसाठी कारागृह प्रशासनाकडून मोडीत काढण्यात आली. सौरभ आणि गौरव लुथरा यांची थेट पनिशमेंट सेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. तिथे चार दिवस काढल्यानंतर त्यांची क्वारंटाईन म्हणजेच अॅडमिशन विभागात पाठवणी करण्यात आली. गँगस्टरसोबत संरक्षण करार करण्यासाठीच लुथरा बंधूंना थेट पनिशमेंट सेलमध्ये ठेवण्याचा उद्देश होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.