२ लाखांची मालमत्ता वाचविली : चार काजू उत्पादकांना आर्थिक फटका

वाळपई : हिवरे येथील देवसू या डोंगरावर मंगळवारी सकाळी अचानकपणे काजू बागायतीला आग लागून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. चार काजू उत्पादकांना याचा फटका बसला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास यश मिळवले. यामुळे सुमारे दोन लाख रुपयांची मालमत्ता वाचली आहे.
हिवरे येथील महादेव लक्ष्मण गावकर, धोलू शिवा गावकर, तुकाराम देऊ गावकर व आप्पा देऊ गावकर यांच्या काजू बागायतीला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. मात्र, आग विझविणे शक्य न झाल्यामुळे वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. त्यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश मिळवले.
महादेव गावकर यांच्या काजू बागायतीमध्ये असलेली झोपडी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. झोपडीमध्ये असलेले सामान जळून नष्ट झाले, असे गावकर यांनी सांगितले.
काजू बागायतदार महादेव गावकर म्हणाले, मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत काजू बागायत जळाली. काजू बागायतीवर आपला उदरनिर्वाह चालत होता. आता काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
तुकाराम गावकर यांनी आगीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. आग लागल्यानंतर ती विझविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आला. मात्र, तो शक्य झाला नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. यामुळे अनेकांच्या काजू बागायती आगीपासून वाचल्या. अन्यथा मोठ्या प्रमाणात आगीचे तांडव या भागामध्ये निर्माण झाले असते.
आमदारांनी लक्ष देणे गरजेचे
हिवरे भागामध्ये अशाप्रकारे आग लागून काजू बागायतदारांना फटका बसलेला आहे. काजू बागायती अनेकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते. आमदार डॉ. देविया राणे यांनी यासंदर्भात लक्ष देऊन नुकसानग्रस्त काजू बागायतीदारांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर काम करून मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. यामध्ये ए. एन. देसाई, एम. एस. गावडे, नार्वेकर, गावकर, आर. यू. गावकर, ए. ए. शेटकर यांचा समावेश होता.
५०० हून जास्त काजू झाडांना आग
आग लागण्याचे निश्चित कारण समजलेले नाही. मात्र, सुक्या गवताला आग लागून ही घटना घडण्याची शक्यता स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या यंत्रणेने व्यक्त केली. अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे ५०० पेक्षा जास्त काजूची झाडे या आगीमध्ये जळालेली आहेत. यामुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या संदर्भाचा अहवाल संबंधित खात्याच्या यंत्रणेला पाठविण्यात येणार आहे.