चेन्नईतील स्वच्छता कर्मचारी महिलेचे होतेय कौतुक

चेन्नई : सोन्याच्या दराने (Gold) सध्या उच्चांक गाठला आहे. एक तोळे सोने म्हणजेच १० ग्रॅम सोने खरेदी करायचे असेल, तर तब्बल १ लाख ४५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत आपल्याला रस्त्यावर बेवारस स्थितीत असलेले ४५ तोळे सोन्याचे दागिने सापडले तर? कल्पनेनेच आपण हुरळून जाऊ. पण एका स्वच्छता करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून ती दागिन्यांची पिशवी आपल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. याबद्दल देशभरात तिचे कौतुक होत आहे.

तामिळनाडूतील चेन्नई (Chennai, Tamil Nadu) शहरात रविवारी एका मंदिराजवळील आपले स्वच्छता करण्याचे काम संपवून एस. पद्मा (S. Padma) नामक महिला घरी परतत होती. त्याआधी तिने हातमोजे आणि झाडू आपल्या वरिष्ठांकडे जमा केली. तिथून निघताना टी नगर येथील मुपथु अम्मन कोइलजवळ तिला एक बेवारस बॅग सापडली. तिने ती उघडून बघितली असता, आत सोन्याचे दागिने असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिच्या जागी अन्य कोणी असता, तर त्याने स्वार्थी विचार केला असता मात्र. पद्माने ताबडतोब आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली.
नंतर, तिने ते दागिने पोंडी बाजार पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांकडे सोपविले. दरम्यान, काही वेळेपूर्वी दाखल केलेल्या एका तक्रारीवरून पोलिसांनी दागिन्यांच्या मालकाचा शोध घेतला आणि त्याला ती बॅग सोपवली.
‘मला वाटले की, जर मी दागिने पोलिसांकडे नेण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर संबंधित कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागेल. मला समाधान वाटत आहे की, दागिने त्यांच्या मूळ मालकाकडे परत देण्यात आले,’ असे पद्मा म्हणाली.
गडबडीत विसरला दागिन्यांची बॅग
ही बॅग रमेश यांची होती. एका व्यक्तीसोबत ते बोलण्याच्या नादात चुकून बॅग तिथेच विसरले होते. मात्र पद्मा यांनी कोणताही विचार न करता आपल्या वरिष्ठांना माहिती दिली आणि ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. ४५ तोळे सोन्याची किंमत आजच्या बाजारभावानुसार ६५ लाख रुपये आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दखल...
चेन्नई येथील ४८ वर्षीय स्वच्छता कर्मचारी पद्मा यांच्या प्रामाणिकपणाची दखल थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी घेतली. पद्मा यांच्या या अनुकरणीय प्रामाणिकपणाबद्दल मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सचिवालयात त्यांना १ लाख रुपये देऊन सत्कार केला.