पर्वरीतील प्रकार : तीन नेपाळी युवकांना अटक

म्हापसा : पीडीए कॉलनी, पर्वरी येथे परप्रांतीय तरुणांना सार्वजनिक ठिकाणी दारू न पिण्याची विनंती करणे एका स्थानिकाला महागात पडले. या प्रकारावरून वाद होऊन तिघांनी स्थानिकाला मारहाण केली. यात त्यांना इजा झाली असून साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार रविवार दि. ११ रोजी घडला. पीडीए कॉलनी, पर्वरी येथे मिहीर आगशीकर (४४) यांच्या घराजवळील एका वाईन शॉपबाहेर तीन तरुण दारू पित बसले होते. अशा प्रकारे उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, अशी सूचना त्यांनी त्या तरुणांना केली. मात्र त्या तरुणांनी मिहीर यांना शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवून दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर याप्रकरणी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मिहीर यांना मारहाण करणाऱ्या सुमन थापा (३१), प्रेम परियार (२४) व उदीप थारू (२२) या तिन्ही मूळ नेपाळी युवकांना साळगाव पोलिसांनी अटक केली आहे.