बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकरला अटक

बर्च क्लब दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांची कारवाई


16th January, 11:03 pm
बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकरला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याला चिखली-कोलवाळ येथे ताब्यात घेऊन हणजूण पोलिसांनी अटक केली. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ३० डिसेंबरपासून बागकर भूमिगत होता. शुक्रवारी बागकर चिखली कोलवाळ भागात असल्याची माहिती मिळताच पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आले.
हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी क्लबचे मालक लुथरा बंधू व अजय गुप्ता यांच्यासह एकूण नऊ जणांना अटक केली. तिघांची जामिनावर सुटका झाली आहे. हडफडे-नागवाचे अपात्र सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ पंचायत सचिव रघुबीर बागकर यांचा म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ३० डिसेंबर रोजी जामीन अर्ज फेटाळला होता. या आदेशाला दोघांनीही उच्च न्यायालयात आव्हान दिले असून सुनावणी सुरू आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस दोघांचाही शोध घेत होते. रोशन रेडकरचा शोध सुरूच आहे.
दंडाधिकारी अहवालात रेडकर, बागरकरवर ठपका
न्यायदंडाधिकारी अहवालात बर्च दुर्घटनेला कारणीभूत गंभीर प्रशासकीय त्रुटी, नियमभंग प्रक्रियेवर ठपका ठेवला आहे. सरपंच रोशन रेडकरने अवैध आस्थापनाला अप्रत्यक्ष संरक्षण दिले, तर पंचायत सचिव रघुवीर बागकरने कागदपत्रांची पडताळणी न करता व नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत व्यवहारांना चालना दिली, असे अहवालात म्हटले आहे.