‘बर्च’ला व्यवसाय परवान्याच्या प्रस्तावाला सरपंचावर विश्वास ठेवून दिला होकार!

हडफडेच्या पंचांची साक्ष : बर्च दुर्घटना प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
40 mins ago
‘बर्च’ला व्यवसाय परवान्याच्या प्रस्तावाला सरपंचावर विश्वास ठेवून दिला होकार!

पणजी : ‘बर्च बाय रोमिओ लेन’ चा ठराव चर्चेसाठी आल्यावर सरपंचांवर विश्वास ठेवून अनुमोदन दिल्याची साक्ष इतर पंचांनी दिली आहे. पंच सदस्यांची दिशाभूल करण्यासाठी अर्जावर घर क्रमांक मुद्दामहून नमूद केला आहे, असा दावा आणि इतर मुद्दे उपस्थित करून तत्कालीन सरपंच रोशन रेडकर आणि सचिव रघुवीर बागकर यांनी क्लबला मदत केली आहे, असा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ रोजी होणार आहे.

हडफडे येथील बर्च क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी झालेल्या अग्नितांडवात २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी रोशन रेडकर आणि रघुवीर बागकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोघांचाही अर्ज फेटाळून लावला. या आदेशाला दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

क्लब संदर्भातील अर्जावर खोडाखोड करून दुसराच घर क्र. दाखवून १६ डिसेंबर २०२३ रोजी व्यावसायिक परवाना दिला. या अर्जावर १४ डिसेंबर २०२३ रोजी पंचायत सदस्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही पंचांचा हणजूण पोलिसांनी जबाब नोंद केला आहे. बैठकीत मांडलेल्या ठरावावर सरपंचांवर विश्वास ठेवून अनुमोदन दिल्याचा जबाब त्यातील पंचांनी दिला आहे. त्यामुळे पंचायत सदस्यांची दिशाभूल करण्यासाठी घर क्रमांक अर्जावर नमूद केला आहे. 

संबंधित क्लब बेकायदेशीर असल्याचे समोर आल्यानंतर आणि जमीनदोस्त करण्याचा आदेश जारी केल्यानंतर अतिरिक्त पंचायत संचालनालयाने जमीनदोस्त करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी सरपंच आणि सचिवाने काहीच केले नसल्याचे दिसून आले आहे. असा युक्तिवाद हणजूण पोलिसांतर्फे सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे यांनी केला. 

हेही वाचा