वन खात्याची कारवाई : पुन्हा आदेशाचे उल्लंघन न करण्याची तंबी

वाळपई : म्हादई अभयारण्यातील सुर्ल येथील जळवण्याच्या धबधब्यावर भ्रमंतीसाठी गेलेल्या कर्नाटकातील २९ जणांना गुरुवारी वनखात्याने ताब्यात घेतले. संबंधितांवय प्राथमिक स्वरूपाची कारवाई करून गुरुवारी रात्री उशिरा वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आले. मात्र, पुन्हा अभयारण्य क्षेत्रात प्रवेश केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वनखात्याने दिला आहे.
म्हादई अभयारण्याचे परिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तरी तालुक्यातील सुर्ला परिसरात असलेल्या जळवण्याच्या धबधब्यावर गुरुवारी दुपारी काही नागरिक आदेशाचे उल्लंघन करून आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. त्यानंतर तत्काळ वनखात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथे कर्नाटकातील सुमारे २९ जण धबधब्यावर फिरत असल्याचे आढळून आले. चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीसाठी वाळपई येथे ताब्यात
सर्वांना ताब्यात घेऊन वाळपई येथील वनखात्याच्या कार्यालयात आणण्यात आले. ते सर्वजण बेळगाव व आसपासच्या भागातील असून, त्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी असल्याचे समोर आले. प्राथमिक चौकशी व कारवाईनंतर गुरुवारी रात्री उशिरा वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
जळवण्याचा धबधबा अत्यंत धोकादायक
जळवण्याचा धबधबा हा सुर्ला गावापासून काही अंतरावर असून अत्यंत धोकादायक मानला जातो. गेल्या वर्षी याच ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह शोधण्यासाठी वनखाते व अग्निशामक दलाला दोन दिवस प्रयत्न करावे लागले होते. घनदाट जंगल, अरुंद आणि निसरडी वाट तसेच वन्यप्राण्यांचा धोका असल्याने हा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या घटनेनंतर हा धबधबा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
अभयारण्यात अनेक धबधब्यांवर अजूनही बंदी
सत्तरी तालुक्यातील व म्हादई अभयारण्यातील अनेक धबधबे अजूनही पर्यटकांसाठी बंद आहेत. यापूर्वी अनेक अपघात व मृत्यू झाल्यामुळे वनखात्याने ही बंदी लागू केली आहे. तरीही काही पर्यटक नियम धाब्यावर बसवून बेकायदा प्रवेश करत असल्याचे वारंवार आढळून येत आहे. भविष्यात असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अभयारण्य प्रशासनाने दिला आहे.
सोशल मीडियामुळे वाढतोय धबधब्यांकडे जाण्याचा मोह
जळवण्याचा धबधबा हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार असून परिसर अतिशय सुंदर आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल झाल्यामुळे अनेकांना या ठिकाणी भेट देण्याचा मोह आवरत नाही. यामुळेच बंदी असूनही पर्यटक येथे येण्याचा प्रयत्न करत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
अनेकांनी दिली खोटी नावे
कर्नाटकातील २९ जणांना ताब्यात घेतल्यानंतर वाळपई कार्यालयात जबाब नोंदवताना अनेकांनी खोटी व बनावट नावे सांगण्याचा प्रयत्न केला. नंतर प्रतिज्ञापत्र घेताना हा प्रकार उघडकीस आला. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला आणि त्यांची सुटका रात्री उशिरा झाली.