हरमल हादरले! रशियन पर्यटकाने गळा चिरून केली मैत्रिणीची निर्घृण हत्या

पोलिसांनी काही तासांत आवळल्या संशयिताच्या मुसक्या. नशेत कृत्य केल्याचा संशय.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
39 mins ago
हरमल हादरले! रशियन पर्यटकाने गळा चिरून केली मैत्रिणीची निर्घृण हत्या

पेडणे:  हरमल (Arambol) येथील गिरकरवाडा भागात एका रशियन पर्यटकाने आपल्याच मैत्रिणीची अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपी अलेक्सेई लिओनोव्ह (वय ३७) याने आपली मैत्रीण  एलेना कास्तानोव्हा (वय ३७) हिचा गळा चिरून खून केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जानेवारी रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित अलेक्सेई आणि मृत एलेना हे दोघेही रशियन नागरिक असून हरमल येथील एका भाड्याच्या खोलीत राहत होते. रात्री दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयिताने एलेनाचे हात दोरीने पाठीमागे बांधून तिला खोलीत कोंडले. त्यानंतर धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून तिला जागीच ठार केले.

घटनेच्या वेळी एलेना हिने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका मैत्रिणीने तिथे धाव घेतली. पकडले जाण्याच्या भीतीने संशयित अलेक्सेईने पहिल्या मजल्यावरून उडी मारून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. मात्र, गुन्हा केल्यानंतर काही तासांतच, म्हणजेच १६ तारखेला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास, तो पुन्हा आपल्या मैत्रिणीला पाहण्यासाठी घटनास्थळी परतत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

स्थानिक रहिवासी उत्तम नाईक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२६(२) आणि १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक व पेडणे निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावला. पुढील तपास मांद्रे पोलीस करत आहेत. ड्रग्जच्या नशेत हे हत्याकांड घडले असावे का, याचा शोध पोलीस घेत असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा