क्रौर्याचा कळस: भुकेने व्याकूळ हत्तीने खाल्ला 'देशी बॉम्ब'; तोंडात झाला स्फोट

सहा दिवसांपासून अन्नाविना तडफड, अखेर मृत्यू. ओडिशा येथील घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
36 mins ago
क्रौर्याचा कळस: भुकेने व्याकूळ हत्तीने खाल्ला 'देशी बॉम्ब'; तोंडात झाला स्फोट

अंगुल (ओडिशा): मानवी क्रौर्याचा एक अतिशय वेदनादायक प्रकार ओडिशामधून समोर आला आहे. येथील अंगुल जिल्ह्यातील बंतला वनपरिक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षांच्या तरुण नर हत्तीने शिकारीसाठी ठेवलेला जिवंत देशी बॉम्ब चघळल्याने त्याच्या तोंडात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे हत्तीच्या जबड्याला आणि तोंडाच्या आतील भागाला खोलवर जखमा झाल्या होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, बलुकटा गावाजवळील पथरागडा साही परिसरात हा जखमी हत्ती अतिशय दयनीय अवस्थेत आढळून आला. डुक्कर, हरिण आणि तत्सम प्राणांची शिकार करण्याच्या उद्देशाने काही शिकाऱ्यांनी जंगलात देशी बॉम्ब लपवून ठेवले होते. अन्नाच्या शोधात असलेल्या या हत्तीने चुकून हा बॉम्ब तोंडात धरला आणि त्याचा जोरात स्फोट झाला. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, ही घटना साधारण पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली असावी. जखमांमुळे हत्तीला अन्न ग्रहण करणे किंवा पाणी पिणेही अशक्य झाले. 

हत्तीची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि कपिलाश, सतकोसिया येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्तीला बेशुद्ध करून त्याच्या जखमांची साफसफाई करण्यात आली असून त्याला प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देण्यात आली आहेत. उपचारांनंतर हत्तीला थोडा शुद्धी आली तरी, वेदनांमुळे तो काहीसा आक्रमक झाला होता. संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते. दरम्यान तब्बल सहा दिवस अन्नपाण्यावाचून तडफड झाल्याने त्याचा अखेर मृत्यू झाला.

वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अज्ञात शिकाऱ्यांविरुद्ध तपास सुरू केला आहे. जंगलात अशा प्रकारचे स्फोटक कुणी आणि का ठेवले, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे जीवघेणे प्रयोग करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.