राज्यात २१ एमएलडी पाण्याची टंचाई

मंत्री सुभाष फळदेसाई : ६ महिन्यांत पाणी पुरवठ्यात होणार मोठी वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago
राज्यात २१ एमएलडी पाण्याची टंचाई

पणजी : राज्याची पाण्याची गरज ६९५ एमएलडी असताना सध्या ६७४ एमएलडी पाणी उपलब्ध आहे. राज्यात सध्या २१ एमएलडी पाण्याची तूट भासत असली, तरी येत्या ६ महिन्यांत अतिरिक्त ३२६ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर राज्यात एकूण १ हजार एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होईल, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
मंत्री फळदेसाई म्हणाले की, सध्या राज्यात ४२ टक्के पाणी हे ‘नॉन रेवेन्यू वॉटर’ (एनआरडब्लू) गटात जाते. पाईपलाईनमधून होणारी पाण्याची गळती आणि सदोष मीटर्समुळे पाण्याचा हिशेब लागत नाही. यावर उपाय म्हणून आता राज्यात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा प्रस्ताव असून, २१७.८० किमी लांबीची जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


सभागृहात पाणी प्रश्नावर खडाजंगी
राज्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह आमदार एल्टन डिकोस्ता, कार्लुस फेरेरा, वीरेश बोरकर, विजय सरदेसाई, व्हेंजी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विजय सरदेसाई, मायकल लोबो, दिलायला लोबो, गोविंद गावडे आणि राजेश फळदेसाई यांनी आपापल्या मतदारसंघातील पाण्याची भीषण समस्या सभागृहासमोर मांडली.
नव्या प्रकल्पांमुळे मिळणार दिलासा
गांजे, तुये आणि मोर्ले येथील पाणी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ३२५ एमएलडी अतिरिक्त पाणी साठ्यात वाढ होईल. यामुळे भविष्यात गोव्यातील पाणी टंचाईची समस्या कायमची दूर होईल, असा विश्वास मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला.          

हेही वाचा