सोनशी-सत्तरीत एक वर्षापासून पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामस्थ हैराण

वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर धडक : तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 mins ago
सोनशी-सत्तरीत एक वर्षापासून पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामस्थ हैराण

वाळपई : गेल्या एक वर्षापासून होंडा सोनशी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अनेक वेळा तक्रारी करूनही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या काळात ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनशी हा गाव खाणग्रस्त क्षेत्रात मोडतो. एकेकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर खाण व्यवसाय सुरू होता. त्यामुळे गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत, विहिरी आटल्या आहेत. खाण व्यवसाय सुरू असताना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र खाणी बंद झाल्यानंतरही गावात समाधानकारक पाणीपुरवठा होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी अनेक वेळा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निषेधार्थ गुरुवारी त्यांनी थेट वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर जाऊन आपला तीव्र संताप व्यक्त केला.

ग्रामस्थांनी सांगितले की, खाणग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज ६०० लिटर शुद्ध पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दररोज पाणी देण्याऐवजी दोन दिवसांनी एकदा टँकरद्वारे अपुरा पाणीपुरवठा केला जातो, अशी त्यांची तक्रार आहे.

सोनशी गावातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसांत नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू न झाल्यास, आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

दोन दिवसांनी एकदाच टँकर

ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. दररोज पाणी मिळण्याऐवजी दोन दिवसांनी एकदा टँकर येतो. अनेक वेळा तोही वेळेवर येत नाही. टँकरमधील पाणी घरासमोर ठेवलेल्या बॅरलमध्ये भरले जाते. रस्त्यावर फिरणारी जनावरे हेच पाणी पित असल्यामुळे ते दूषित होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.