पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात कार्यक्रम : राज्यपातळीवर विविध कार्यक्रम

पणजी : गोवा सरकारच्या (Goa Government) राजभाषा संचालनालयातर्फे राज्यपातळीवर ‘अस्मिताय दीस’ (जनमत कौल) (Opinion Poll) कार्यक्रम उद्या शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रम गोवा राज्य जैवविविधता मंडळ, साळगाव, गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, साळगाव आणि नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालय, पर्वरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या मुख्य सभागृहात मुख्यमंत्री तसेच राजभाषा मंत्री डॉ. प्रमोद सावंत, विज्ञान, तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन मंत्री आतानसियो मोन्सेरात व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सोहळ्यात गोव्यातील पारंपारिक खाद्य पदार्थांना मिळालेल्या जीआय टॅग प्राप्त झालेल्या अर्जदारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यातील फुलवाले, भाजीवाले, पाडेली/रेंदेर, मीठागार कामगार, मच्छीमार, ग्रामीण वैद्य, पदेर अशा पारंपारिक व्यावसायिकांना ‘कौशल्य मित्र कार्ड’ दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे जीआय टॅग प्राप्त झालेल्या गोमंतकीय उत्पादनांचे प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आले आहे. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमात होणार आहे. यावेळी पुस्तक प्रदर्शन होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर कला व संस्कृती संचालनालय आणि गोवा कोकणी अकादमी यांच्यातर्फे ‘अस्मितेची गीतां’ हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मुख्य सोहळ्याबरोबरच राज्यभरात विविध ठिकाणी अनुदानित संस्थांतर्फे जनमल कौल दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिव्यांग मुलांसाठी चेतना एज्युकेशन सोसायटी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन कुडचडे येथे सकाळी १० वा. ‘अस्मितेचो भेसरंग’ हा कार्यक्रम होणार आहे. तसेच सत्तरी येथे साहित्य मंथन सत्तरी, पीएम श्री सरकारी हायस्कूल, ठाणे सत्तरी यांच्या सहकार्याने सकाळी १० वाजता ‘अस्मिताय आनी तरणाटे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दाल्गाद कोकणी अकादमीतर्फे सेंट थॉमस चर्च हॉल, कासावली येथे सकाळी ९.३० वा. कोकणी गीत संगीत कार्यक्रम आणि दुपारी ३.३० वाजता पणजी येथे कविता सांज कार्यक्रम होणार आहे.