पत्रकारांचा संताप

पणजी: १५ जानेवारी २०२६ चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' या प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला चिरडण्यासाठी प्रशासनाने आज तांत्रिक शस्त्राचा वापर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विधानसभेवर काढण्यात आलेल्या महामोर्चाचे वार्तांकन रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी 'सिग्नल जॅमर'चा वापर केल्याने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आज सकाळी १०:३० च्या सुमारास शेकडो आंदोलक अटल सेतू आणि मांडवी पुलाजवळ एकत्र आले होते. या ऐतिहासिक आंदोलनाचे 'लाईव्ह' प्रक्षेपण करण्यासाठी सर्वच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सज्ज होते. मात्र, अचानक सर्व पत्रकारांच्या मोबाईलचे सिग्नल गायब झाले आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. सुरुवातीला तांत्रिक बिघाड असावा असे वाटले, पण पोलिसांच्या ताफ्यात 'सिग्नल जॅमर' बसवलेली गाडी असल्याचे लक्षात येताच पत्रकारांनी पोलिसांना धारेवर धरले.
माहिती पोहोचवण्यापासून आम्हाला रोखणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे, तुम्हाला माहितीचे प्रसारण रोखण्याचा अधिकार कोणी दिला ? अशा शब्दांत पत्रकारांनी जाब विचारला. पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर आणि हा प्रकार थेट जनतेसमोर मांडण्याचा इशारा दिल्यानंतर, अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि जॅमर हटवण्यात आले. त्यानंतरच आंदोलनाचे दृश्य जनतेपर्यंत पोहोचू शकले.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज विधानसभेत मागणी केली की, सरकारने लोकांच्या भावनेचा विचार करून या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ नये आणि प्रकल्प कायमचा रद्द करावा. तर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती देताना सांगितले की त्यांनी उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा आदेश वाचला असून, त्यावर कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण या निर्णयाला आव्हान द्यायचे की नाही, हे कायदेशीर सल्लागार ठरवतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत चर्चा सुरू असताना मांडवी पुलावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. पोलिसांनी आंदोलकांना विधानसभेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. तर जॅमर लावून किंवा लाठ्याकाठ्या वापरून आमचा आवाज दाबता येणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.