
नवी दिल्ली (New Delhi) : भारतात (India) आता आफ्रेझा (Afrezza) नावाने सादर करण्यात आलेल्या इनहेल्ड इन्सुलिनचा (Inhaled insulin) पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या (injection) इन्सुलिनपासून सुटकारा मिळू शकतो. इनहेल्ड इन्सुलिन जे इंजेक्शनच्या भीतीने इन्सुलिन थेरपी सुरू करण्यास इच्छुक नसलेल्या रुग्णांसाठी महत्त्वाचा पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.
काही मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिन इंजेक्शनशिवाय नियंत्रित करता येऊ शकत नाही का? असा प्रश्न डॉक्टरना विचारत असतात. इन्सुलिन थेरपीला उशीर करण्यामागे इंजेक्शनची भीती हे एक प्रमुख कारण आहे. इंजेक्शनच्या भीतीने इन्सुलिन घेण्याचे रुग्ण टाळतात व त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडते. आणि दीर्घकालीन गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो, असे पिंपणी, पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाटील यांनी सांगितले. त्यांच्यासाठी इनहेल्ड इन्सुलिन उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंजेक्शनच्या सुईमुळे काहीजण हे इन्सुलिन घेणे टाळतात. लहान सुया असल्या तरीही त्यांना नकोशा वाटतात. काहीजणांना व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे इन्सुलिन इंजेक्ट करून घेणे गैरसोयीचे वाटते. अशा परिस्थितीत इनहेलड इन्सुलिनचा पर्याय सोयीस्कर ठरू शकत असल्याचे ठाणे येथील किम्स हॉस्पिटलचे डायबेटोलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. विजय नेगलूर यांनी सांगितले. सिप्लाद्वारे आफ्रेझा नावाने भारतात इनहेल्ड इन्सुलिन सादर करण्यात आले आहे. ज्यांना दिवसातून इन्सुलिनची अनेक इंजेक्शने घ्यावी लागतात; त्यांच्यासाठी सुईचा वापर न करता उपलब्ध असलेले इनहेल्ड इंजेक्शन उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
इनहेल्ड इन्सुलिन कसे वापरले जाते?
पारंपारिक इन्सुलिन हे त्वचेला इंजेक्शन देऊन केले जाते. इनहेल्ड इन्सुलिन फुफ्फुसाच्या एपिथेलियमद्वारे शोषले जाते. जे रक्तप्रवाहात शोषण्यासाठी इंटरफेस म्हणून काम करते. आणि पारंपारिक इन्सुलिनपेक्षा वेगाने काम करून शरीरातून लवकर बाहेर पडत असल्याचे मुंबई सेंट्रल येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रणव घोडी यांनी सांगितले.
जेवणाच्या वेळी ग्लुकोजची वाढ कमी करण्यासाठी टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी एफडीएने मंजूर केलेली कोरडी पावडर, एकल-वापर कार्ट्रिज (४, ८ आणि १२ युनिट्स) वापरून एका लहान, सुज्ञ इनहेलरद्वारे दिली जाते. "ते लिस्प्रो किंवा एस्पार्ट सारख्या इंजेक्टेबल रॅपिड-अॅक्टिंग इन्सुलिनपेक्षा वेगाने रक्तप्रवाहात पोहोचते," असे जयपूर येथील बिर्ला हॉस्पिटलच्या मधुमेह तज्ज्ञ डॉ. हेताश्वी गोंडलिया यांनी सांगितले.
दमा, फुफ्फुसांचे आजार असलेल्यांनी इनहेल्ड इन्सुलिन टाळावे
इनहेल्ड इन्सुलिनचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. दमा किंवा फुफ्फुसांचे इतर आजार असलेल्या रुग्णांनी इनहेल्ड इन्सुलिन वापरू नये. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सुरू करावे, असे डॉक्टर सांगतात.