पत्नीला हॉस्पिटलात दाखल करून औषधे आणण्यासाठी गेला असता झाला अपघात

सातारा : भारतीय सैन्य दलातील (Indian Army) एका जवानाचा (Soldier) पत्नीच्या डिलिव्हरीसाठी गावी आला असतानाच अपघाती मृत्यू झाला. पत्नीला बाळंतपणासाठी हॉस्पिटलात (Hospital) दाखल केले. औषधे आणण्यासाठी दुचाकीने बाहेर पडला आणि टेम्पोच्या धडकेत ठार झाला. त्यानंतर पत्नीने एका मुलीला जन्म दिला. शेवटी अंत्यदर्शनासाठी पत्नी व मुलीला रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणले. पत्नीने आक्रोश करीत स्ट्रेरचरवरून आपल्या पतीच्या तोंडावरून हात फिरवत शेवटचे दर्शन घेतले. जन्म होऊन केवळ आठ तास उलटलेल्या चिमुकल्या मुलीलाही वडिलांचे दर्शन घडवले. ह्रदय हेलावून सोडणारे हे दृष्य पाहून वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानात आलेल्या अनेकांच्या अश्रूंचे बांध फूटले. शोकाकुळ वातावरणात भारतीय सैन्यातील प्रमोद जाधव या वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यात आला.
महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा तालुक्यातील (Satara Taluka) दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे सिकंदराबाद, श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात हवालादार म्हणून सेवा बजावत होते. आई नसल्याने आपल्या पत्नीच्या बाळंतपणासाठी रजा टाकून आठ दिवसांपूर्वीच गावी आले होते. पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर प्रमोद जाधव यांनी आपल्या पत्नीला हॉस्पिटलात दाखल केले. त्यानंतर औषधे आणण्यासाठी बाहेर गेलेले प्रमोद परतलेच नाहीत. औषधे घेऊन येत असताना त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. एका टेम्पोने धडक दिल्याने जागीच ठार झाले. त्यानंतर पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, त्यापूर्वीच आनंदाच्या क्षणाचे दु:खात रुपांतर झाले होते.
कुणी तरी धाडस करून त्यांच्या पत्नीला पती अपघातात ठार झाल्याचे सांगितले. काही वेळापूर्वीच चिमुकलीला जन्म दिलेल्या पत्नी ऋतुजा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटलातील डॉक्टर, नर्स, गावकरी, नातेवाईक यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नी ऋतुजा व आठ तासापूर्वी जन्मलेल्या बाळाला रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आले. स्ट्रेचरवरून पत्नीने आपल्या पतीचे अंतिम दर्शन घेताना नवऱ्याच्या चेहऱ्यावर शेवटचा हात फिरवला. चिमुकल्या मुलीलाही सरणावर चढवण्यासाठी ठेवलेल्या तिच्या जन्मदात्या पित्याच्या मृतदेहाचे दर्शवन घडवले. आणि स्मशानात मोठ्या संख्येने जमलेल्यांच्या अश्रूंचा बांध फूटला. अनेकांना हुंदके आवरणे कठीण झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिक, माजी सैनिक, प्रशासनातील अधिकारी, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानाचा अकाली मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. एकूण हे दृष्य पाहून अनेकांना हुंदके आवरणे कठीण झाले.