ग्रामदैवतासमोर कोलझरवासीयांची ‘भीष्म प्रतिज्ञा’ : दिल्ली लॉबीविरुद्ध एल्गार

दोडामार्ग : इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये (Eco -Sensitive Zone) (SEZ) समाविष्ट असलेल्या कोलझर येथील पर्यावरण (Environment) वाचवण्यासाठी गावाने दिल्ली (Delhi) लॉबीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. यासाठी सगळ्या गावाने एकत्र येत गावच्या जमिनी (Land) विकायच्या नाही आणि असा प्रयत्न करणार्यांना एकजुटीने कायदेशीर मार्गाने धडा शिकवायचा, असा निश्चय केला. यावेळी उपस्थितांत तरुणांची संख्या लक्षवेधी होती.
वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार केंद्राने अधिसूचना काढून कोलझर हे गाव इकोसेन्सिटीव्ह भाग म्हणून जाहीर केले आहे. येथे पर्यावरणाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. याशिवाय येथे २०१८ पासून वृक्षतोड बंदी आदेश लागू आहे. असे असूनही गेल्या आठवड्यात काही ‘दिल्ली लॉबी’शी संबंधित लोकांनी स्थानिक जमीन मालकांना तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ख्रिश्चनवाडीपासून पुढच्या भागात घनदाट जंगलापर्यंत अवैधरित्या उत्खनन केले आहे.
ख्रिश्चनवाडीपासून पलिकडच्या गावातील (शिरवल) न्हयखोलपर्यंत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आणि सुमारे १२ फूट रुंदीचे रस्तासदृश उत्खनन केले आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली. थेट झालेल्या अतिक्रमणाविरोधात लढा पुकारण्यासाठी गाव एकवटला. यासाठी रविवारी गावच्या मंदिरात बैठक झाली. यावेळी देवस्थान मानकरी, स्थानिक याबरोबरच तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी अवैधरीत्या झालेल्या उत्खननाचा निषेध करण्यात आला. याबाबत ज्यांच्या जमिनीतून हे उत्खनन केले गेले, त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी विचारण्यात आली नाही किंवा त्यांना याबाबत कसलीही कल्पना दिली नाही. या डोंगरात जायला कोणत्याही प्रकारचा रस्ता अस्तित्वात नव्हता आणि सध्या नाही. डोंगरात रस्ता झाला तर तेथील समृद्ध पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढेल आणि तेथील जैवविविधतेला धोका पोहोचेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
उत्खनन व वृक्षतोड यामुळे येथील पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. दिल्ली लॉबीशी संबंधित काहींनी येथील जमीन खरेदीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. असेच प्रकार सुरू राहिल्यास जंगलात मानवी हस्तक्षेप वाढून जैवविविधता धोक्यात येण्याबरोबरच ‘वाघाचा कॉरिडॉर’ संकटात सापडणार आहे. असे प्रकार आमच्या गावात खपवून घेणार नसल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. वन विभागाने या संदर्भात पावले उचलून हे अतिक्रमण तसेच वृक्षतोड करणार्यांना शोधून काढावे, त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आंदोलनात्मक आणि कायदेशीर मार्गाने पावले उचलावी लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जमिनी न विकण्याची ग्रामदैवतासमोर प्रतिज्ञा
ग्रामस्थांनी एकत्र येत गावचे ग्रामदैवत श्री. देवी माऊलीकडे नारळ ठेवून पुर्वजांचा ठेवा असलेल्या गावच्या जमिनी रक्ताच्या नात्याबाहेर विकणार नाही अशी शपथ घेतली. गावाची जैवविविधता, येथील पर्यावरण आणि त्यावर आधारीत येथील कृषी व्यवस्था अबाधित राहावी, असे साकडे घालण्याबरोबरच अशा गावहिताविरोधातील गोष्टींना पाठबळ देणार्यांना कधीच साथ न देण्याचा निश्चय करण्यात आला.
महसूलच्या पथकाकडून उत्खननाची मोजमापे
ग्रामस्थांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवल्याचे समजताच दोडामार्ग महसूल विभागाचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी झालेल्या उत्खननाची मोजमापे तसेच इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली. यावेळीही मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरुण याठिकाणी जमले. जमिन मालकांना अंधारात ठेवून हे कृत्य करणार्यांवर तातडीने कारवाई करा. येथे आधी कोणताही रस्ता अस्तित्वात नसताना केलेली खोदाई आणि वृक्षतोड याला जबाबदार असणार्यांना शोधून काढा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.