भारतीय सुरक्षा दल अलर्टवर

जम्मू : पाकिस्तानचे (Pakistan) नापाक इराधे पुन्हा एकदा पुढे आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या पुन्हा एकदा कुरापती सुरू झाल्या आहेत. यापूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली होती. पाकिस्तानने यावेळी भारतावर ड्रोनने (Drone) हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने (India) पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले होते. आता पाकिस्तानने सीमा रेषेवर पुंछ, राजौरी, सांबामध्ये शेकडो ड्रोनद्वारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दल अलर्टवर आहे.
रविवारी रात्री उशीरा जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक ड्रोन्स घिरट्या घालताना दिसले. भारतीय हद्दीत शिरलेल्या ड्रोनवर जवानांनी गोळीबार केला. पाकिस्तानमधून हे ड्रोन सोडल्याचे पुढे आल्यावर सांबा, राजौरी व पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. शस्त्रे किंवा अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी हे ड्रोन्स पाठवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शोध मोहीमही हाती घेण्यात आली आहे.