सोमनाथ स्वाभिमान पर्व : सोमनाथ मंदिरावरील हल्ल्यास १००० वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची महाआरती

सोमनाथ : ज्या सोमनाथ मंदिराला कायमचे मिटवण्याचे स्वप्न परकीय आक्रमकांनी पाहिले, तो सोमनाथ आजही आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक म्हणून ताठ मानेने उभा आहे. गजनीपासून औरंगजेबापर्यंतचे सर्व आक्रमक काळाच्या पडद्याआड गेले आणि इतिहासात दफन झाले, मात्र सोमनाथचे अस्तित्व आणि भारतीयांची श्रद्धा आजही अढळ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथच्या गौरवशाली आणि संघर्षमय इतिहासाचे वर्णन केले. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' निमित्त सोमनाथ मंदिरात विधिवत दुग्धाभिषेक आणि विशेष पूजा-अर्चना केल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात पंतप्रधानांनी मंदिराच्या हजार वर्षांच्या संघर्षाचा अत्यंत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, १०२६ मध्ये महमूद गजनवीने केलेल्या भीषण आक्रमणापासून ते १८ व्या शतकात औरंगजेबाने केलेल्या विध्वंसापर्यंत, या मंदिराने अनेक जखमा सोसल्या आहेत. मात्र, प्रत्येक विनाशानंतर सोमनाथ अधिक तेजाने उजळून निघाला. आपल्या पूर्वजांनी महादेव आणि या पवित्र भूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, हे बलिदान वाया गेले नाही. अनेक इतिहासकारांनी या धार्मिक उन्मादाला आणि आक्रमणांना केवळ 'साधारण लूट' म्हणून संबोधून खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला, अशी खंतही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे मंदिरात काढण्यात आलेली भव्य 'शौर्य यात्रा'. १०८ घोडे आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीने सोमनाथच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृती जागवल्या. पंतप्रधान मोदी स्वतः या शौर्य यात्रेत सहभागी झाले होते. ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गजनवीच्या आक्रमणांनंतर १२ व्या शतकात मंदिराचे पुनर्निर्माण झाले. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी, अहमद शाह आणि महमूद बेगडा यांसारख्या आक्रमकांनी वेळोवेळी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने तर मंदिर अपवित्र करण्याचा आणि ते मशिदीत बदलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन करून श्रद्धेची ज्योत अखंड तेवत ठेवली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळावर भाष्य करताना पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत सरदार पटेलांनी सोमनाथच्या पुनर्निर्माणाचा संकल्प सोडला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याला 'धार्मिक पुनरुज्जीवनवाद' म्हणत विरोध दर्शवला होता आणि राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना उद्घाटनाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राष्ट्रपतींनी तो विरोध झुगारून मंदिराचे लोकार्पण केले, ही घटना भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची नांदी होती. 'सोमनाथमध्ये विकासही आहे आणि वारसाही', अशा शब्दांत पंतप्रधानांनी नव्या भारताचा संकल्प मांडला.
