तेलंगणात ५०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले : निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्यासाठी कृत्य

पाच सरपंचांसहीत सहा जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
तेलंगणात ५०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले : निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्यासाठी कृत्य

तेलंगणा : तेलंगणात (Telangana) सुमारे ५०० भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) विष (Poison)  देऊन मारल्याने एकच खळबळ माजली आहे. निवडणुकीतील (Election) आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील विविध गावांमध्ये (Villages) गेल्या आठवड्यात सुमारे ५०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याचा आरोप प्राणी संघटनांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पाच सरपंचांसहीत एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

यासंदर्भात प्राणी मित्र संघटनेचे कार्यकर्ते अदुलापुरम गौतम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कामारेड्डी जिल्ह्यातील पलवांचा, भावनीपेट, बंदारमेश्र्वरपल्ली व वाडी या गावांमध्ये नियोजनबद्धरित्या भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत २०० कुत्र्यांना मारण्यात आल्याचा गौतम यांचा दावा आहे. 

यासंदर्भात आपल्याला माहिती मिळाल्यावर आपण एका मित्रासोबत पाहणी केली असता; भावनीपेट मंदिराजवळ अनेक कुत्रे मरून पडलेले दिसले. विषारी इंजेक्शन दिल्याने कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. किशोर पांडेय नावाच्या एका व्यक्तीला या कामासाठी नेमल्याचे म्हटले जात आहे. मृत कुत्र्यांना गावांबाहेर पुरण्यात आले होते. पशुवैद्यकीय पथकाने ते बाहेर काढून शव‌विच्छेदन केले. देण्यात आलेले विष निश्चित करण्यासाठी व मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणात नावे पुढे आलेल्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

डिसेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यावेळी काही उमेदवारांनी भटके कुत्रे व माकडांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

हेही वाचा