
केरळ : एसआयटीने (SIT) केरळातील (Kerala) सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील (Sabarimala Temple) सोन्याच्या चोरीप्रकरणात (Gold Theft) मुख्य पुजारी पंडारारू राजीवारू यांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ११ जणांना अटक केली आहे.
पंडारारू राजीवारू मंदिरातील वरिष्ठ धार्मिक अधिकारी आहेत. त्यांचा पूजेचे साहित्य व दागिन्यांपर्यंत थेट संबंध येतो. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणात त्यांची मुख्य भूमिका असू शकते; असा संशय याप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीला आहे. त्यामुळेच अधिक तपासासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. २०१९ साली हे चोरीचे प्रकरण घडले होते. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. एसआयटीने याप्रकरणी केलेल्या तपासात चोरी प्रकरणात मंदिरातील अंतर्गत व्यक्तींचा संबंध असू शकतो, असे माहितीत पुढे आले होते.
मंदिरातील चोरी व अफरातफरीचे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात पोहोचल्यावर विशेष तपास पथक स्थापन करून याप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर याप्रकरणी तपास सुरू झाला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित उन्नीकृष्णन पोट्टी व माजी त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष पद्मकुमार यांनी दिलेल्या जबानीतून मुख्य पुजाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.