ईडीचा खळबळजनक दावा. आय-पॅकच्या कार्यालयांवर छापे; २० कोटींचे 'हवाला' कनेक्शन उघड

कोलकाता: पश्चिम बंगालमधील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यातील गैरव्यवहाराचे धागेदोरे आता थेट गोव्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पोहोचले आहेत. राजकीय सल्लागार संस्था असलेल्या 'आय-पॅक'ने (I-PAC) कोळसा घोटाळ्यातील किमान २० कोटी रुपये हवालामार्गे गोव्यात वळवल्याचा खळबळजनक दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. याप्रकरणी ईडीने कोलकाता येथील आय-पॅकचे कार्यालय आणि संस्थेचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

ईडीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोळसा घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनुप माजी याच्या निकटवर्तीयांनी व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून या व्यवहारांचे नियोजन केले होते. कोलकात्याहून ही २० कोटींची रक्कम 'आर. कांतीलाल' आणि 'राजेश मगनलाल' या हवाला कंपन्यांमार्फत गोव्यात पाठवण्यात आली. गोव्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला टीएमसीच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी ही रोकड देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित सागर कुमार पटेल, अक्षय कुमार आणि पंकज मलिक यांसारख्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यांनी ही रक्कम हवालामार्गे मिळाल्याची आणि ती आय-पॅकच्या कामासाठी वापरल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे.

या कारवाई दरम्यान एक मोठा राजकीय वादही निर्माण झाला आहे. कोलकाता येथील छाप्यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासात अडथळा आणला आणि महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. याविरोधात ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीती आणि गोपनीय डेटा चोरण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पलटवार केला आहे.

गोव्याच्या गेल्या निवडणुकीत केवळ बंगालमधील कोळसा घोटाळाच नव्हे, तर दिल्लीतील मद्य घोटाळ्यातील पैसाही वापरला गेल्याचा संशय ईडीने यापूर्वी व्यक्त केला होता. आता या नवीन खुलाशामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी उच्च न्यायालयात होणार असून, या हवाला रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या नावांचा समावेश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.