न्यायालय देणार लवकरच आदेश : पुढील सुनावणी २० जानेवारीला

नवी दिल्ली (New Delhi) : नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून (Stray Dogs) होणारे हल्ले चिंतेची बाब बनली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली आहे. यापुढे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोणी जखमी झाल्यास किंवा मृत्यू पावल्यास संबंधित राज्य सरकारना भरपाई द्यावी लागणार. यासंदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालय लवकरच काढणार आहे. याप्रकरणी २० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता व न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांची समस्या व नागरिकांवर होणारे हल्ले याविषयी सरकारला सुनावले. ‘भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात मागच्या पाच वर्षांपासून राज्य सरकारांनी कोणत्याही नियमांची अंमलबजावणी केलेली नाही. राज्य सरकारांनी त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी घ्यावी, असे संकेत न्यायालयाने दिले.
‘भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवर खाऊ घालणारे श्वानप्रेमी यांचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. श्र्वानप्रेमींनाही उत्तरदायी ठरवले जाणार’, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सुनावणी सुरू होऊन चार दिवस झाले; त्यात कुत्र्यांच्या बाबतीत तीव्र भावना दिसून आल्या. मात्र, माणसांच्या बाबतीत तशा भावना दिसून आल्या नाहीत. कुत्रे ज्यावेळी एका ९ वर्षांच्या मुलावर हल्ला करतात; त्यावेळी कुणाला जबाबदार धरायचे? कुत्र्यांना खाऊ घालत असलेल्या संस्था की अन्य कोणाला? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. एक विशिष्ट प्रकारचा विषाणू कुत्र्यांमध्ये असतो; त्यावर उपचार नाही. या प्रकारांकडे डोळेझाक करू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावले.
कुत्र्यांना निवारा म्हणून सार्वजनिक ठिकाणांचा वापर करू नका
कुत्र्यांना निवारा म्हणून हॉस्पिटले, बस स्थानके, रेल्वे स्थानके, शैक्षणिक संस्था इत्यादी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करू नका. सार्वजनिक ठिकाणे ज्यांना अनुकुल दिसतात; त्यांनी कुत्र्यांना आपल्या घरी घेवून जावे; असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
घरी घेऊन का जात नाही?
‘प्राण्यांबद्दल एवढे प्रेम, जिव्हाळा असेल तर त्यांना तुमच्या घरी घेऊन का जात नाही? रस्त्यांवर फिरायला, लोकांना चावायला त्यांना का सोडून देतां’, अशा शब्दांत न्यायालयाने श्वानप्रेमींना सुनावले.