मुख्यमंत्र्यांकडून आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या आरएसएस आणि वंदे मातरम संदर्भातील विधानाचा तीव्र निषेध

पणजी: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमधील तीव्र संघर्षाने गाजला. आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि 'वंदे मातरम' या घोषणेचा संदर्भ देत केलेल्या विधानामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. व्हिएगस यांच्या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.
काल सभागृहात झालेल्या या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक 'वंदे मातरम' म्हणत नाहीत, असा दावा करण्याचा अधिकार आमदार व्हेंझी यांना नाही. या विधानामुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते. सभापतींनी हस्तक्षेप करत सर्व सदस्यांना सभागृहाची शिस्त पाळण्याचे आवाहन केले, परंतु दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका लावून धरल्याने तणाव कायम होता.

या प्रकरणाचे पडसाद आज सकाळीही उमटले. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा संकुलात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार व्हेंझी यांच्यावर टीका करताना म्हटले की, भारताच्या जडणघडणीत आणि राष्ट्रनिर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान अत्यंत मोठे आहे. व्हेंझी यांना इतिहास माहीती नसेल, तर तो त्यांनी माहीत करून घ्यावा.
दुसरीकडे, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनीही या विधानाचा निषेध केला. व्हेंझी व्हिएगस यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून, कोणतेही भाष्य करण्यापूर्वी त्यांनी संघाच्या कार्याची आणि योगदानाची माहिती घ्यायला हवी होती, असे साळकर यांनी नमूद केले. या वादामुळे अधिवेशनातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आगामी कामकाजातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.