रस्ते हॉटमिक्स करण्यापूर्वी संबंधित खात्यांशी समन्वय बंधनकारक : दिगंबर कामत

पणजी : गोव्याच्या ८ व्या विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून वादळी वातावरणात सुरू झाले असून, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या सत्रात २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रोज सकाळी ११:३० वाजता कामकाजाला सुरुवात होणार असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत.
१.०० | विधानसभेसाठी एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी पणजीतील आझाद मैदानावर 'आदिवासी समाज, गोवा' संघटनेचे धरणे आंदोलन.
१२: ३४ | २०२५ मध्ये गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई!
अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) २०२५ मध्ये विक्रमी १६३ गुन्हे नोंदवून २१२ जणांना अटक केली. आंतरराज्य तस्करी रोखण्यासाठी एनसीबी व ई़डीसोबत समन्वय असून, "ड्रग्ज खपवून घेणार नाही," असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
११: ३९ | रस्ते हॉटमिक्स करण्यापूर्वी संबंधित खात्यांशी समन्वय बंधनकारक
रस्ते हॉटमिक्स करण्यापूर्वी सर्व संबंधित खात्यांशी समन्वय साधणे आता अनिवार्य असेल. पत्रव्यवहारात कसूर केल्यास कार्यकारी अभियंत्यावर कारवाई केली जाईल. पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित खात्यांच्या प्रमुखांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, जी या सर्व कामांवर बारकाईने लक्ष ठेवेल : दिगंबर कामत, पीडब्ल्यूडी मंत्री
११:३० | टॅक्सी चालकांसाठी 'गुड न्यूज' लवकरच
टॅक्सी व्यवसायातील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लवकरच टॅक्सी चालकांसाठी एका महत्त्वाच्या आणि फायदेशीर निर्णयाची घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले.
११.२० | गोड बोलूया आणि गोव्याचे रक्षण करूया! : युरी आलेमाव
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केले आहे. केवळ गोड बोलून चालणार नाही, तर गोव्याचे जंगल आणि पर्यावरणाचा विनाश थांबवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. डोंगर कापणी, कोळसा प्रदूषण आणि वाढती गुन्हेगारी रोखून गोव्याचे रक्षण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी गोमंतकीयांना केले आहे.
११:०३ | मुख्यमंत्र्यांचे व्हेंझींना चोख प्रत्युत्तर
आमदार वेंझी यांनी RSS वर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक शब्दांत निषेध केला. व्हेंझी यांना देशाचा इतिहासच माहीत नाही, अशा शब्दांत ताशेरे ओढले.
'वंदे मातरम्' आणि आरएसएसवरून विधानसभेत गदारोळ
विधानसभेत 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष चर्चा सुरू असताना काल संध्याकाळी आमदार वेंझी व्हिएगस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उल्लेख केला. या विधानामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला.