आंदोलनाची वाढती धग लक्षात घेता खामेनेईचा इंटरनेटवर बंदी लादण्याचा आदेश; विमान सेवाही कोलमडली

तेहरान: इराणमध्ये महागाई आणि चलनाची घसरण यांविरोधात सुरू झालेल्या जनक्षोभाने आता उग्र रूप धारण केले असून संपूर्ण देश हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये आतापर्यंत ६५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ही निदर्शने देशातील १८० शहरांमध्ये पसरली आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून इराण सरकारने देशात इंटरनेट सेवा आणि टेलिफोन कॉल्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

इराणमधील या असंतोषाची ठिणगी सर्वप्रथम २८ डिसेंबर २०२५ रोजी तेहरानमधील दोन बाजारपेठांत पडली. वाढती महागाई आणि इराणी रियालचे घसरलेले मूल्य यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेने रस्त्यावर उतरून अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निषेध सुरू केला. आता हे आंदोलन ३१ प्रांतांमधील ५१२ ठिकाणांपर्यंत पोहोचले असून, आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमकी सुरू आहेत. इराणच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत मृतांच्या आकड्यावर मौन पाळले होते, मात्र शुक्रवारी त्यांनी ६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी या हिंसाचारासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या 'दहशतवादी एजंट्स'ना जबाबदार धरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका करताना खामेनेई यांनी त्यांना अहंकारी संबोधले असून त्यांचे हात इराणी जनतेच्या रक्ताने माखलेले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, देशातील ढासळत्या सुरक्षा व्यवस्थेमुळे दळणवळण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.
दुबई आणि इराण दरम्यानच्या किमान १७ विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर तुर्की एअरलाइन्सनेही इराणच्या हवाई क्षेत्रावरून जाणारी आपली उड्डाणे खबरदारीचा उपाय म्हणून रद्द केली आहेत. इराणच्या माहिती आणि दळणवळण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशातील सध्याची परिस्थिती आणि सुरक्षेची खबरदारी म्हणून इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात असले तरी, जनतेचा रोष कमी होताना दिसत नाही.