सरकारचे १०० कोटी असेच खर्ची घातल्यास आपल्यावर खटला दाखल करा; माजी मुख्यमंत्री पार्सेकर

तुये हॉस्पिटलच्या आंदोलनात झाले सहभागी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
सरकारचे १०० कोटी असेच खर्ची घातल्यास आपल्यावर खटला दाखल करा; माजी मुख्यमंत्री  पार्सेकर

पेडणे :  तुये हॉस्पिटल (Tuem Hospital) हे आपण लिंक हॉस्पिटल म्हणून उभारले होते.  तशा प्रकारचा लेखी करार नसेल किंवा सरकारचे शंभर कोटी असेच आपण खर्ची घातले असतील, तर सरकारने (Government) आपल्यावर खटला दाखल करावा; अशी मागणी माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. तुये हॉस्पिटल कृती समितीने (Tuem Hospital Action Committee) आयोजित केलेल्या साखळी उपोषणात पाचव्या दिवशी सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले. 

 तुये हॉस्पिटल हे बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावे; अशी एकमेव मागणी समोर ठेवत तुये हॉस्पिटल कृती समितीने साखळी उपोषण करीत आंदोलन सुरू केले आहे. पाचव्या दिवशी माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थिती लावून आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी नवनिर्वाचीत जिल्हा पंचायत सदस्य राधिका उदय पालयेकर, मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमानपंच बाळा उर्फ प्रशांत नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कळशावकर, मांद्रेचे  माजी सरपंच तथा विद्यमान पंच अॅड. अमित सावंत,  तुयेचे माजी सरपंच निलेश कांदोळकर, पंच उदय मांद्रेकर,  पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, तुळशीदास राऊत, आम आदमी पक्षाच्या सुवर्णा हरमलकर, गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर, पेडणे तालुका विकास अॅड. जितेंद्र गावकर, प्रणव परब, निमंत्रक व्यंकटेश नाईक, पेडणे नागरिक समितीचे निमंत्रक अॅड. सदानंद वायंगणकर, निलेश पटेकर संतोष शेटगावकर, राजू नरसे, ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई, तुये हॉस्पिटल कृती समितीचे निमंत्रक जुझे लोबो, जगन्नाथ देसाई, देवेंद्र परब, प्रदीप परब व अनेकांनी पाठिंबा दिला. 

 माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, तुये हॉस्पिटल आणि त्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात; त्या नजरेतून हे हॉस्पिटल उभारण्यात आले होते. दोन वर्षांच्या कारक‌िर्दीत विक्रमी काळात इमारत पूर्ण झाली. परंतु त्यानंतरच्या निवडून आलेल्या आमदारांनी या हॉस्पिटल विषयी काहीच कार्यवाही न केल्याने; हा प्रकल्प रखडल्याचा दावा केला.

 हे हॉस्पिटल लिंक करण्याविषयी लेखी नव्हते. तर खाजन गुंडो बांधावर इव्हेंट केले जातात. ते लेखी स्वरूपात होते का?  असा प्रश्न माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थित केला.  हॉस्पिटल उभारताना सर्व प्रकारचे करार नियमितपणे पूर्ण केले. मान्यताही प्राप्त केल्याचे ते म्हणाले. सीएचसी हॉस्पिटल हे २५ खाटांचे असू शकते. १०० खाटांचे असू शकत नाही. १०० खाटांचे  हॉस्पिटल गोमेकॉला लिंक करण्यासाठी  उभारल्याचे माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत  पार्सेकर यांनी स्पष्ट केले. मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

 मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्या अॅड. अमित सावंत, हरमल जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर, माजी सरपंच तथा पंच प्रशांत उर्फ बाळा नाईक, गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कलंगुटकर, कॉंग्रेसचे अॅड. जितेंद्र गावकर, प्रणव परब, राजू नरसे, ‘मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत तुये हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 

 

















हेही वाचा