आतापर्यंत २५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इराणमध्ये सध्या सरकारविरोधी निदर्शने सुरू असून, या परिस्थितीचा फायदा घेत अमेरिका इराणवर थेट हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराण सध्या गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठ्या अंतर्गत संकटाचा सामना करत आहे. धार्मिक नेतृत्व आणि सरकारविरोधात देशभर निदर्शने होत आहेत. दरम्यान, हे आंदोलन चिरडण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत २५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी या आंदोलकांना पाठिंबा जाहीर करत इराणला इशारा दिला आहे.
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका आपल्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांचा वापर करू शकते. ओमान, कतर, बहरीन, कुवैत आणि इराक येथे अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत. गेल्या वर्षी इराणने कतरमधील 'अल उदैद' एअरबेसवर हल्ला केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या या तळांवर पलटवार होण्याचा धोका कायम आहे.
राष्ट्रवादाची लाट उसळण्याची भीती
अनेक परराष्ट्र धोरण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने हल्ला केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. बाह्य शक्तीने हल्ला केल्यास इराण सरकार 'राष्ट्रवादाचा' आधार घेऊन जनतेला आपल्या बाजूने उभे करू शकते. यामुळे सध्या सुरू असलेले सरकारविरोधी आंदोलन कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
इराणचा प्रतिहल्ल्याचा इशारा
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली शमखानी यांनी अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराण कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले असून, याआधीही इराणने अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करून आपली क्षमता सिद्ध केली आहे.