नगरपालिकेचा निर्णय : पालिकेच्या सर्व वास्तूंवर उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

साखळी : एका वर्षात साजऱ्या होणाऱ्या तीन राष्ट्रीय दिवसांना सर्व नगरसेवकांनी गांभीर्याने व आदरभावनेने उपस्थित राहावे, यासाठी साखळी नगरपालिकेने (Sanquelim Municipality) ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे. सलग तीन राष्ट्रीय दिवसांचे सोहळे चुकविणाऱ्या नगरसेवकाचा एका महिन्याचा पगार कापला जाणार आहे. तसा ठराव गुरुवारी झालेल्या नगरपालिका मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष सिद्धी प्रभू (Siddhi Prabhu Porob) यांनी हा ठराव मांडला व त्याला सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली.
राज्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day), १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन (Independence Day) व १९ डिसेंबर हा गोवा मुक्तिदिन (Goa Liberation Day) असे तीन राष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. नगरपालिकेतर्फे या दिवशी सकाळी ठराविक वेळेलाच ध्वजारोहण (Flag Hoisting) होते. परंतु या राष्ट्रीय दिवसांना काही नगरसेवक दांडी मारतात. स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आम्ही आज स्वतंत्र देश व राज्यात मोकळेपणाने वावरत आहोत. त्यांच्या बलिदान व देशाच्या सन्मानार्थ प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा राष्ट्रीय दिनी सोहळ्यांना उपस्थित राहायलाच हवे, असा मुद्दा मांडत यापुढे जो नगरसेवक सलग राष्ट्रीय दिनाचे तीन सोहळे चुकवेल, त्याचा एक महिन्याचा पगार कापला जावा, असा ठराव नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी मांडला.
यावेळी उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, प्रवीण ब्लेगन, रियाझ खान, रश्मी देसाई, निकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी श्रीपाद माजिक, अभियंता सुभाष म्हाळशेकर, धीरज नागवेकर, नारायण परब व इतरांची उपस्थिती होती.
दरम्यान, साखळी नगरपालिका इमारतीवर साकारण्यात आलेल्या सौरऊर्जा वीज यंत्रणेचा नगरपालिकेला लाभ होऊ लागला आहे. नगरपालिकेला वीज बिल शून्य झाले आहे. आता हीच संकल्पना नगरपालिकेच्या मालकीच्या सर्व इमारतींवर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सदर इमारतींनाही येणारे वीज बिल शून्य होऊन नगरपालिकेच्या महसुलाची मोठी बचत होईल, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
भाडेपट्टीवरील खोल्या, फ्लॅट्सना लावणार कचरा कर!
साखळी नगरपालिका क्षेत्रात खोल्या, फ्लॅट्समध्ये भाडेपट्टीवर राहणारे लोक आपला कचरा बाहेर फेकतात. कारण त्यांच्याकडून कचरा कर व घरपट्टी स्वीकारली जात नसल्याने पालिकेचे सफाई कर्मचारीही त्यांच्या दारात जात नाही. यापुढे अशा भाडेपट्टीवरील सर्व खोल्या, फ्लॅट्स यांना कचरा कर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाडेपट्टीवर राहणारे लोक जबाबदारीने कचरा पालिका सफाई कामगारांकडे देतील व पालिकेला महसुलही मिळेल, असा ठराव घेण्यात आला.