
पणजी : युनिटी मॉल प्रकल्प (Unity Mall Project) रद्द करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन आजही सुरू राहणार असून, कदंब पठारावर (Kadamba Plateau) पूर्वीप्रमाणेच प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याबाबत सरकारकडून अजून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने; कदंब पठारावर साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चिंबल जैव विविधता मंडळ समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली.
गेले काही दिवस युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना काल आंदोलकांनी पणजीत मोर्चा काढला होता. आंदोलक मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सरकारने सभागृहात निवेदन देण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ रस्त्यावरच बसल्याने; वाहतुकीचा खोळंबा उडाला. युनिटी मॉल रद्द करण्यासंदर्भात ठोस आश्वासन न मिळाल्याने; रात्री उशीरा पर्यंत आंदोलन सुरू होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलकांची मेरशी जंक्शनजवळ रात्री उशीरा भेट घेऊन चर्चा केली होती. युनिटी मॉलसंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, यावर आंदोलकांचे समाधान झाले नसून, सरकारकडून युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. त्यानुसार आजही पणजी कदंब पठारावर साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.