मडगावात 'सायको' चोरट्याचा थरार! चाकूने वार करून महिलेला चहा बनवण्यास पाडले भाग

रेल्वे स्थानकावर चोरीचा मुद्देमाल विकताना मडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मडगावात 'सायको' चोरट्याचा थरार! चाकूने वार करून महिलेला चहा बनवण्यास पाडले भाग

मडगाव: मडगाव शहरातील कोंब परिसरात एका एकट्या राहणाऱ्या महिलेवर जीवघेणा हल्ला करून, तिला चहा बनवण्यास भाग पाडून लुटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मडगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत संशयित चोरट्याला चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंब येथील रहिवासी कोनी पाशेको या आपल्या घरात एकट्याच असताना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात हिंदी भाषिक चोरट्याने घरात प्रवेश केला. संशयिताने पाशेको यांना चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली आणि जखमी केले. "तुला इतकी मारहाण केली आहे की अर्ध्या तासात तुझा मृत्यू होईल," अशी भीती घालत त्याने पीडित महिलेला चहा बनवण्यास सांगितले. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पाशेको यांनी त्या नराधमाला चहा बनवून दिला. चहा पिऊन झाल्यानंतर चोरट्याने घरातील मोबाईल आणि लॅपटॉप चोरून पळ काढला.

पाशेको यांनी अत्यंत धैर्याने घरातील मधले दार लावून घेतले आणि मागच्या दाराने शेजाऱ्यांकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी शोध मोहीम राबवली. मडगावचे पोलीस निरीक्षक सुरज सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर चोरीचा मोबाईल आणि लॅपटॉप विकण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. सध्या या संशयिताची कसून चौकशी केली जात असून, या घटनेने मडगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकट्या राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा