
मडगाव : आके मडगाव येथे रस्त्यावर सुझुकी अस्सेस या दुचाकीला आग लागली. उपस्थितांनी तसेच अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणले परंतु या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
अग्निशामक दलाकडे दिवसभरात झाड पडल्याचा एक व आग लागण्याचा एक असे दोन कॉल्स आले होते. सकाळी मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या नजीकच्या रस्त्यावर काजूचे मोठे झाड कोसळून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर झाड तोडून रस्त्याबाजूला करत वाहतूक सुरळीत केली. तसेच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आके मडगाव येथील बाबू नाईक यांच्या घराच्या नजीकच्या रस्त्यावरुन जाणार्या दुचाकीला अचानक आग लागली. मडगाव अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तसेच उपस्थितांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आगीने पेट घेतलेला असल्याने यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. मागाहून अग्निशामक दलाने येऊन पाहणी केली.