१९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची दमदार सुरुवात

अमेरिकेवर ६ गडी राखून विजय, हेनिल पटेलचे ५ बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16 mins ago
१९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची दमदार सुरुवात

बुलवायो : १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने विजयी सलामी देत आपली मोहिम दमदार पद्धतीने सुरू केली आहे. गुरुवारी बुलवायो येथे झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयात गोलंदाज हेनिल पटेल याने ५ विकेट घेऊन निर्णायक भूमिका बजावली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी निवडली. अमेरिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने ३९ धावांवर ५ गडी गमावले. अमरिंदर गिल १, साहिल गर्ग १६, उत्कर्ष श्रीवास्तव ०, अर्जुन महेश १६ आणि अमोघ अरेपल्ली ३ धावा काढून बाद झाले. अदनीत झांबने नंतर १८ धावा काढून संघाला ५० च्या पुढे नेले.
शेवटी नितीश सुदिनीने ३६ धावा काढून संघाला ३५.२ षटकांत १०७ धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून हेनिल पटेलने ५ बळी घेतले. तर वैभव सूर्यवंशी, दीपेश देवेंद्रन, आर.एस. अंबरीश आणि खिलन पटेल यांना प्रत्येकी १-१ यश मिळाले. एक फलंदाज धावबादही झाला.
१०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्का बसला. वैभव सूर्यवंशी फक्त २ धावा करून बाद झाला. त्याला अमेरिकेच्या वेगवान गोलंदाज ऋत्विक अप्पीदीने बोल्ड केले. भारताने ४ षटकांत १ विकेट गमावून २१ धावा केल्या होत्या, तेव्हाच पाऊस सुरू झाला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर संघाला ९६ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले.
कर्णधार आयुष म्हात्रे १९ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर वेदांत त्रिवेदी २ आणि विहान मल्होत्राही १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. विकेटकीपर अभिज्ञान कुंडूने नंतर कनिष्क चौहानसोबत मिळून संघाला १८ व्या षटकात विजय मिळवून दिला. कुंडू ४२ आणि कनिष्क १० धावा करून नाबाद राहिले.
अमेरिकेसाठी ऋत्विक अप्पिदीने २ विकेट घेतल्या. ऋषभ सिंपी आणि उत्कर्ष श्रीवास्तवला प्रत्येकी १ विकेट मिळाली. शब्रिश प्रसाद आणि अदित कप्पाला एकही विकेट घेता आली नाही. भारताकडून ५ विकेट घेणारा हेनिल पटेल सामनावीर ठरला.
वेस्ट इंडीजने टांझानियाला हरवले
ग्रुप-डी मध्ये वेस्ट इंडीज आणि टांझानिया यांच्यात विंडहोक येथे सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टांझानिया १२२ धावांवर सर्वबाद झाला. संघाकडून दयालन ठकरारने २६ आणि दर्पण जोबनपुत्राने १९ धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून विटेल लाव्सने ३ बळी घेतले. फलंदाजीमध्ये तानेज फ्रान्सिसने ५२ आणि यष्टिरक्षक जूल अँड्र्यूने ४४ धावा करून संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील ग्रुप-सी चा सामना अनिर्णित राहिला.
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम
वैभव सूर्यवंशी आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तो अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा त्याचे वय १४ वर्षे २९४ दिवस इतके होते. आतापर्यंत एकाही खेळाडूला वयाच्या १५ व्या वर्षापूर्वी वर्ल्ड कप खेळता आलेला नाही. यापूर्वी हा विक्रम कॅनडाच्या नितीश कुमार याच्या नावावर होता. त्याने १५ वर्षे २४५ दिवस वय असताना २०१० मध्ये वर्ल्ड कप खेळला होता. वैभवने तब्बल १५ वर्षांनंतर हा विक्रम मोडीत काढला आहे.भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ अवघ्या ३५.२ षटकांत १०७ धावांवर गारद झाला. यानंतर वैभवच्या फटकेबाजीची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, एका आक्रमक फटक्याचा प्रयत्न करताना वैभव केवळ ४ चेंडूत २ धावा काढून बाद झाला. भारताची धावसंख्या १२ असतानाच तो बाद झाल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.