सुरक्षा संदर्भात त्रुटी : संयुक्त अंमलबजावणी समितीची कारवाई

पणजी : तिसवाडी तालुक्यात अग्निशमन दलाचा परवाना नसल्याच्या कारणावरून पाटो - पणजी येथील सोहो क्लब आणि राजकीय नेत्याच्या जमिनीवर असलेले रायबंदर येथील क्लब वाईब्स या आस्थापनांला सील ठोकण्यात आले आहे. ही कारवाई नागरी सेवेच्या वरिष्ठ श्रेणी अधिकारी विवेक नाईक यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अंमलबजावणी समितीने केली आहे.
शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री हडफडे येथील बर्च क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेचा तपास दंडाधिकारी समितीमार्फत सुरू करण्यात आला. तसेच राज्यातील किनारी भागातील आस्थापनांच्या बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करण्यासाठी नागरी सेवेच्या वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, तिसवाडी तालुक्यात कारवाई करण्यासाठी नागरी सेवेतील अधिकारी विवेक नाईक यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद मिश्रा, विशेष विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत चोडणकर, स्टेशन फायर ऑफिसर धिरज देसाई आणि वीज खात्याचे कार्यकारी अभियंता जुल्येट कारेकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
या समितीने १५ जानेवारी २०२६ रोजी पाटो येथील प्रसिद्ध सोहो क्लब आणि रायबंदर येथील क्लब वाईब्स या आस्थापनांची पाहणी केली. त्यात अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला आणि अनेक सुरक्षा संदर्भात त्रुटी आढळल्या. याची दखल घेऊन वरील दोन्ही क्लबला बंद करण्यात आले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्स व इतर आस्थापनांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. यानुसार या दोन आस्थापनांची पाहणी करून त्यांना बंद करण्यात आले आहे.