'ती' नसताना

कुटुंबाचा कणा असलेल्या गृहिणीच्या कष्टाची जाणीव अनेकदा ती समोर नसल्यावरच होते. घर कसं चालतं, हे कळेपर्यंत दमछाक होणाऱ्या एका कुटुंबाची ही मार्मिक कथा.

Story: लेखणी |
16th January, 10:18 pm
'ती' नसताना

"सुगंधा, अगं सुगंधा, बघ किती उशीर झाला. झोपलीस का तू?" रवी जरा ओरडतच बोलला. "आई गं!" सुगंधा अंथरुणावरून उठायचा प्रयत्न करत असताना 'धडाम' करून पुन्हा खाटेवर कोसळली. "काय गं, काय होतंय? सुगंधा... ए सुगंधा!" रवी घाबरला.

​"काहीतरी होतंय रवी, मला काहीतरी होतंय," सुगंधा म्हणाली. एवढं बोलून तिने डोळे झाकले. रवी जोरात ओरडला, "आई, ए आई, बघ गं हिला काहीतरी होतंय!" त्याच्या आवाजाने राहुल आणि रिंकी अंथरुणावरून उठून बसले. रवीची आई सावित्री खोलीत आली. एरवी कडक असलेली सासू आज मात्र सुनेला या अवस्थेत पाहून घाबरली. "सुगंधा, काय होतंय बाळा? डोळे उघड," तिने सुगंधाचे डोके मांडीवर घेत विचारले. "आई, मला काहीतरी होतंय," सुगंधा डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली.

​"रवी, हिला रुग्णालयात घेऊन जा बरं. आणखी वेळ काढू नकोस," सावित्री घाबरतच म्हणाली. रवी लगबगीने तयार झाला. त्याने सुगंधाला उचलून गाडीत घातले. शतपावली करायला गेलेले सुगंधाचे सासरे जनार्दन हे सर्व पाहून गोंधळून गेले. त्यांना मुलांची काळजी घ्यायला सांगून सावित्री रवीसोबत गेली. रुग्णालयात पोहोचताच डॉ. नेहा यांनी सुगंधाला तपासले. डॉक्टरांनी बाहेर थांबायला सांगताच रवी आणि सावित्री बाहेर गेले.

​"सुगंधा, काय होतंय तुला? डोळे उघडून बघ. तू हॉस्पिटलमध्ये आहेस," डॉ. नेहा म्हणाल्या. सुगंधाने हळूच डोळे उघडले. "काय होतंय तुला सुगंधा? मी तुझा बी.पी., शुगर सर्व तपासलं, सगळं नॉर्मल आहे. नक्की काय त्रास आहे?" डॉ. नेहांच्या कपाळावर आठ्या आल्या. "डॉक्टर, जरा जवळ येता का? मी तुमच्या कानात सांगू?" सुगंधा म्हणाली. तिने डॉक्टरांच्या कानात काहीतरी पुटपुटले. "हम्म... ही तर गंभीर बाब आहे. बरं, मी बघते," नर्सना काही सूचना देऊन डॉक्टर बाहेर आल्या.

​रवी आणि सावित्री दोघेही काळजीत पुढे झाले. डॉ. नेहा म्हणाल्या, "हे बघा मिस्टर देशमुख, सुगंधाला दोन-चार दिवस रुग्णालयात थांबावं लागेल. काही टेस्ट कराव्या लागतील, त्यानंतरच आम्ही काही सांगू शकू." रवी गंभीर झाला आणि सावित्रीही घाबरली. "काळजी करू नका, तुम्ही घरी जा. आम्ही तिची काळजी घेऊ. ती आता शुद्धीवर आहे, तुम्ही तिला भेटू शकता," असे सांगून डॉक्टर कॅबिनमध्ये गेल्या.

​सावित्री आणि रवी तिला भेटायला आत गेले. "बरी आहेस ना आता? कसं वाटतंय?" सासूने विचारले. "हम्म... रवी, काहीतरी होतंय," सुगंधा हळूहळू डोळे उघडत म्हणाली. "बरं, तू आराम कर, मी इथेच थांबतो," रवी म्हणाला. "नको रवी, तू नको थांबूस. आई, तुम्ही दोघे निघा आता. मी आराम करते. माझी काळजी घ्यायला नर्स आहेत इथे. तुम्ही जा," सुगंधा म्हणाली. "नक्की ना?" रवीने खात्री करून घेतली. "हो रे, मी गरमागरम डबा पाठवते," असे सावित्री म्हणाली आणि दोघे घराकडे निघाले.

​घरी आल्यावर सावित्रीला काय करावे आणि काय नको, असा प्रश्न पडला. चहा-नाश्ता करायचा, केर काढायचा की स्वयंपाकाची तयारी? राहुल आणि रिंकी आज शाळेची तयारी करून बसले होते. आईला काळजीत पाहून रवीने लगबगीने दुकानातून पाव आणले आणि मुलांना जॅम लावून खायला दिले. डब्यातही तेच दिले. शाळेची बस हॉर्न वाजवत होती, धावपळीत तो मुलांना पाण्याच्या बाटल्या द्यायला विसरलाच. "आई, मी ब्रेड खातो, तू बाबांना चपात्या भाजून दे, त्यांच्या गोळ्यांची वेळ झाली आहे," रवी झाडू मारणाऱ्या आईला म्हणाला. "हो रे बाबा, झाडू मारते आणि देते," आई म्हणाली. अखेर रवीने आईच्या हातातून झाडू घेतला आणि आई किचनकडे वळली.

​चहा गॅसवर ठेवून ती चपात्या करत होती. जवळजवळ वीस दिवस झाले होते तिला चपात्या करून. जनार्दन यांनी तोंड वाकडे करत बायकोने भाजलेल्या कडक चपात्या कशाबशा घशाखाली उतरवल्या. रोज सुगंधाच्या हातचा चवदार चहा प्यायची सवय असलेल्या सासऱ्यांना आज बेचव चहा प्यावा लागला. गोळ्या देताना तर रवीची पुरती पंचायत झाली. सुगंधा एका मिनिटात सर्व गोळ्या काढून द्यायची, रवीला मात्र त्या शोधायला पंधरा मिनिटे लागली. सावित्री स्वयंपाक करायला घेणार, तेवढ्यात घरात भाजीच नाही हे तिच्या लक्षात आले. "भाजी नाही तर आधी सांगायचं ना!" रवी जरा चिडला. "अरे, सुगंधा रोज मुलांना बसमध्ये बसवून ताजी भाजी घेऊन यायची, माझ्या लक्षातच नाही राहिलं," आई गडबडली.

​भाजी, आमटीची चव बघत बघत सावित्रीने एकदाची स्वयंपाकाची मोहीम फत्ते केली. रवीने डबा हॉस्पिटलमध्ये नेऊन दिला, तेव्हा सुगंधा झोपली होती. नर्सने 'डिस्टर्ब करू नका' सांगितल्यावर तो परतला. मुले शाळेतून आली होती. त्यांचे जेवण झाल्यावर रवीने विचारले, "काय शिकवलं आज शाळेत?" दोन्ही मुले अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागली. आज पहिल्यांदाच रवी त्यांना अभ्यासाबद्दल विचारत होता. त्याने त्यांच्या वह्या तपासल्या. सावित्री भांडी घासून थोडा डोळा लावणार, तोच जनार्दन यांनी चहाची ऑर्डर सोडली. कपडे वाळत घालणे, भांडी, पूजा, नाश्ता, जेवण... हे सर्व करता करता रात्र कधी झाली, सावित्रीला कळलेच नाही. दिवसभर दमल्यामुळे ती गाढ झोपी गेली.

​इकडे सुगंधा मात्र मजेत होती. तिने रवीला रात्रीचा डबा आणू नकोस असे सुचवले होते. तिथे तिला वेळेवर गरम जेवण, चहा-नाश्ता आणि फळे मिळत होती. चौथ्या दिवशी डॉ. नेहा आल्या. "सुगंधा मॅडम, आता जाणार ना घरी?" डॉक्टर म्हणाल्या. "हो हो, आता जायचंय!" दोघीही मनापासून हसल्या. नर्सला मात्र हे काय कोडं आहे, ते उमजेना.

​सुगंधाने रवीला फोन करून बोलावले. ती बरी झाली आहे हे ऐकून सावित्रीने सुटकेचा नि:श्वास सोडला. "पण डॉक्टर, नक्की काय झालं होतं? टेस्ट रिपोर्ट काय आले?" रवीने गोंधळून विचारले.

​"हे बघा मिस्टर रवी, त्यांची तब्येत लवकर सुधारल्यामुळे टेस्टची गरजच पडली नाही. आता त्या एकदम बऱ्या आहेत," डॉक्टर म्हणाल्या. मग सुगंधाकडे बघून हळूच डोळा मारत म्हणाल्या, "सुगंधा, पुन्हा कधी असं 'काहीतरी होतंय' असं वाटलं, तर नक्की ये हं!" सुगंधाने जीभ चावली आणि रवी मात्र डोके खाजवत सामान बांधू लागला.


सोनिया परब

साळ