“आजोबा म्हणतात काळी आहेस → म्हणजे मी कमी आहे.” आणि मग तो निष्कर्ष आयुष्यभरासाठी त्यांची identity बनतो. पण मग प्रश्न असा आहे, आपण आपल्या मुलांना स्वतःबद्दल तिरस्कार शिकवतोय की स्वतःशी मैत्री?

ती ३२ वर्षांची आहे. छान करिअर. व्यवस्थित संसार. आर्थिक स्वावलंबन. सामाजिक मान्यता. सोशल मीडियावर हसरे फोटो.
पण सकाळी आरशासमोर उभी राहिली की एक आवाज हळूच कुजबुजतो,
“तू अजूनही जाडी दिसतेस...”
तो आवाज तिचा नसतो.
“थोडी कमी खा.”
“किती काळी पडलीस...”
“अशी राहिलीस तर कोण लग्न करेल?”
भारतीय घरांमध्ये ही वाक्ये काळजीच्या कागदात गुंडाळून दिली जातात. जणू काही पालकत्वाचा भागच.
अशावेळी “ती” फक्त शब्द ऐकत नसते तर ती स्वतःबद्दल एक कथा तयार करते.
अलीकडच्या एका संशोधनात १००० पेक्षा जास्त मुलाखतींमध्ये ८४% लोकांनी सांगितलं की त्यांना बालपणी त्यांच्या शरीरावरून हिणवलं गेलं किंवा बोल लावला गेला. आणि त्यापैकी मग सुमारे ६५% जण प्रौढ वयात खाण्याच्या विकारांकडे झुकताना देखील दिसून आले आहेत.
हे आकडे फक्त statistical नाहीत.
हे न बोलल्या गेलेल्या जखमांचे प्रतिबिंब आहेत.
आपण समजतो, की काळ सगळं भरून काढतो.
मुलांना जरासं बोलल्याने त्यांच्या अंगाला भोकं थोडीच पडतात?
तर नाही. भोकं नक्कीच पडत नाहीत परंतु मनाच्या रचनेत मात्र काही अनुभव ‘फ्रीझ’ होतात.
Psychoanalytic भाषेत सांगायचं तर बाह्य आवाज हळूहळू ‘आंतरस्वर’ (internalized voice) बनतो. जो मग superego चा भाग होतो ज्याने बोलणारी व्यक्ती जवळ नसली तरी आपला मात्र आतून सतत स्वतःविषयीचा न्यायनिवाडा सुरूच राहतो.
म्हणूनच अनेक यशस्वी स्त्रिया ज्या व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्या स्वतःच्या शरीराशी मात्र अविरत न संपणारं युद्ध लढत असतात. त्यांच्याकडे पदवी आहे, पगार आहे, पार्टनर आहे. पण आरशात पाहताना त्यांना स्वतःचा चेहरा दिसत नाही, त्यांना दिसतो तो लहानपणीचा तोच क्षण... जेव्हा कोणीतरी हसून म्हणालं होतं, “ ए फॅटी!”
मुळात, ही केवळ सौंदर्याची संकल्पना नसून, ती आत्ममूल्याशी जोडलेली असते. जेव्हा एका मुलाचं कौतुक त्याच्या बुद्धी, संवेदनशीलता, प्रयत्नांपेक्षा त्याच्या दिसण्यावर केंद्रित होतं, तेव्हा ‘मी कशी दिसते/दिसतो’ हे ‘मी कोण आहे’ यावर अधिराज्य गाजवू लागतं.
भारतीय सांस्कृतिक संदर्भात या प्रक्रियेला आणखी एक थर असतो, विवाहाचा.
“कोण लग्न करेल?” हा प्रश्न मुलीच्या अथवा एका मुलाच्या अस्तित्वाशी इतका जोडला जातो, की तिचं वा त्याचं आत्ममूल्य बाह्य स्वीकारावर अवलंबून राहतं.
हे सर्व सांगताना एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती ही, की, असं बोलणारे बहुदा पालकच असतात परंतू ते वाईट नसतात. उलट, अनभिज्ञ असतात. कारण बहुतेक वेळा त्यांनीही हेच ऐकलेलं असतं.
“मी तुला चांगल्यासाठी सांगते...” म्हणताना त्यांना कदाचित कळत नाही, की ते स्वतःच्याच जुन्या जखमा पुढे ढकलत आहेत.
कारण, मुलांचं मन फार निरागस असतं. ते विश्लेषण करत नाही.
ते फक्त निष्कर्ष काढतं.
“आई म्हणते मी जाड आहे → म्हणजे मी चुकीची आहे.”
“आजोबा म्हणतात काळी आहेस → म्हणजे मी कमी आहे.” आणि मग तो निष्कर्ष आयुष्यभरासाठी त्यांची identity बनतो. पण मग प्रश्न असा आहे, आपण आपल्या मुलांना स्वतःबद्दल तिरस्कार शिकवतोय की स्वतःशी मैत्री?
म्हणून बदलाची सुरुवात ‘परिपूर्ण पालक’ होण्यात नाही, ती स्वतःच्या जखमांकडे प्रामाणिक नजरेने पाहण्यात आहे. Conscious parenting म्हणजे फक्त योग्य शब्द वापरणं नाही. ते स्वतःच्या internalized shame ला ओळखणं आहे. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या नजरेतून स्वतःला वाचतात.
कदाचित एवढंच, “तू जशी/जसा आहेस तशी/तसा पुरेशी/पुरेसा आहेस.” जर आपण ही एक वाक्य पुढच्या पिढीला देऊ शकलो,
तर आपण सौंदर्याचा वारसा नाही, आत्मस्वीकृतीचा वारसा देऊ. आणि कदाचित त्याच दिवशी, आरशात दिसणाऱ्या प्रतिमेला आपण पहिल्यांदाच न्याय़निवाड्याशिवाय स्वीकारू.
