"आई म्हणजे घर आणि घर म्हणजेच आई!" स्वतःच्या संसारात गुंतलेल्या एका लेकीने आपल्या आईला लिहिलेले हे भावूक पत्र. बालपणीच्या आठवणी, आईची शिस्त आणि तिने घेतलेले कष्ट यांचा हा कृतज्ञ प्रवास.

प्रिय आई,
सप्रेम नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, थोडे मनातले सांगायचे होते ग तुला. बघ, आता हसशील आणि म्हणशील, "अग, रोज दोन-तीन तरी फोन असतात आपले आणि परत हे वेगळे पत्र कशासाठी? असे काय आहे जे अजून माझ्याशी बोलली नाहीस?" तसे नाही ग, पण काही गोष्टी अशा असतात ना, ज्या आपण बोलू शकत नाही आणि फोनवर तर मुळीच नाही; म्हणूनच हे पत्र.
वैदेही माझी मुलगी एकुलती एक. तिचे कॉलेज, अभ्यास, खाणे-पिणे अगदी सगळे सांभाळेपर्यंत कधी कधी जीव मेटाकुटीला येतो. मध्ये एखादा तास मिळाल्यावर शांत बसल्यावर खरंच डोळ्यांसमोर येतेस ती तू. कसे ग आई, तू सांभाळलेस आम्हाला? पाच जण आम्ही. सर्वांचे जेवण, नाश्ता, शाळा, त्यात घरची-दारची उस्तवार, पै-पाहुणे, कुळागर... अरे बापरे! खरं सांगू, अख्खा गाव तुला 'भाटकारीण' म्हणत असे मानाने. पण तो डोलारा सांभाळताना तू कसा समतोल साधलास ग?
घरात मोठी मी सर्वात, किती लाड केलेस माझे! काही कमी पडू दिले नाहीस. आता म्हणशील की, ते करायलाच पाहिजे मुलांकरता, त्यात काय नवीन! पण नाही आई, तू खरंच खूप केलेस आमच्याकरता. सकाळी शाळेत जाताना तू दिलेल्या तूप-साखर पोळीची चव अजून जिभेवर आहे. ती मऊ लुसलुशीत पोळी आम्हाला कधीच जमली नाही. आणि निदान मला तरी ती जमवायचीही नव्हती, कारण ती पोळी ही माझ्या आईची 'खासियत' होती; आणि ती तिचीच राहावी हा माझा अट्टाहास.
तुला आठवतंय? पावसाळ्यात माटांबीकडे खूप पाणी तुंबायचे त्यावेळी. आम्ही खूप लहान होतो. शाळेतून सुटायच्या वेळी अगदी 'टाइम'वर पोहोचायचीस तू छत्री घेऊन. एवढ्या पाण्यातून अगदी अलगद आणायचीस ग तू! एरवी त्या पाण्यात पाय सुद्धा टाकायला घाबरणारी मी, तुला बघितले की एकदम ताकदवान व्हायची. असो! आणि मग घरी आलो की गरम-गरम उकडा भात, इंदू नुस्तेकारीणने आणलेल्या ताज्या माशांची आमटी आणि चुलीत भाजलेला पापड... हे सगळे तुझ्या हातचे! कधी एकदा पानावर बसतोय असे व्हायचे. पण त्यात एक अडसर तुझा, आधी हातपाय स्वच्छ धुणे. खरंच, असा राग यायचा मला! पोटात इतकी भूक आणि हातपाय काय धुवायचे? पण नाही, प्रेम एका बाजूला आणि शिस्त एका बाजूला, हा तुझा खाक्या! आणि आज मला तेच उपयोगी पडतेय आई.
तुला आठवते, बेडे पडायला लागले की मीही तुझ्याबरोबर कुळागरात यायची. वाटेत खूप निसरडे असायचे, वय ओलांडून जावे लागे. माझा चिमुकला हात घट्ट धरायचीस तू. तुझा तो रखरखीत पण उबदार, विश्वासू हात मी कधीच विसरले नाही आई. हळूहळू शाळा सरली, कॉलेजचे दिवस आले. अर्थात परिस्थिती तशी नव्हती, पण 'माझी मुले शिकली पाहिजेत, पदवीधर झालीच पाहिजेत' हा तुझा आग्रह! शेवटी सगळ्यांनी मान तुकवली तुझ्या हट्टासमोर. आम्ही पाचही भावंडे आज जे काही आहोत ना आई, ते त्या काळी तू घेतलेल्या कठोर निर्णयांमुळेच, हे नक्की.
मी डॉक्टर व्हावे अशी तुझी इच्छा होती, पण ती मात्र मी पूर्ण केली नाही; शिक्षिका झाले. आपल्या मनपसंत मुलाशी हट्टाने लग्न केले मी, पण रागावली नाहीस हो माझ्यावर तू! मला पूर्ण स्वातंत्र्य दिले, फक्त 'जे करशील ते योग्य कर' हा सल्ला देऊनच. आणि मलाही याचा गर्व आहे की, मी माझ्या आईचा विश्वास कधीच तोडला नाही. तू बाबांबरोबर सावर्ड्याला बाजाराला जायचीस, आज सांगते तुला आई, घर अगदी ओकेबोके वाटायचे त्यावेळी. फक्त चार-पाच तासांचा प्रश्न असायचा, पण तू आणि घर असे आम्ही वेगळे करूच शकत नव्हतो. 'आई म्हणजे घर आणि
घर म्हणजेच आई' असे एक समीकरणच होते जणू.
आजही तू जरी शहरात आलीस, वृद्धापकाळाने जरा थकलीस, तरी तुला घरात बघितले तरी शांततेची, विश्वासाची आणि प्रेमाची लहर शरीरातून धावते. मध्ये चार दिवस घरी नव्हतीस तू, अग, कुंडीतली झाडे सुद्धा कोमेजून गेली! तू आल्यावर कशी टवटवीत झाली ग परत? आई, हे सर्व न बोलण्यासारखे आहे, इतके दिवस हे मनात साचले होते. मी जर हे बोलले असते ना, तर तू माझी चेष्टा केली असतीस, मला जवळ घेतले असतेस आणि रडली असतीस, म्हणूनच आज पत्र लिहिते तुला. मी खरंच नशीबवान आहे
की मला तुझ्यासारखी आई मिळाली,
जी खंबीरपणे माझ्या बऱ्या-वाईटात साथ देत आहे.

- सौ. रेशम जयंत झारापकर