पुरुषांची चिडचिड म्हणजे राग नसून, तो त्यांच्या हतबलतेचा हुंदका असतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि भावना व्यक्त करण्यास मनाई असलेल्या पुरुषांच्या मनातील 'मौन' समजून घेण्याचा हा एक संवेदनशील प्रयत्न.

मागील भागात आपण स्त्रियांच्या मनातील द्वंद्व आणि अपेक्षांमधून निर्माण होणारी चिडचिड समजून घेतली. आजचा हा विषय आपल्या घरातील, आयुष्यातील 'पुरुषांसाठी' आहे. चिडचिडीचे मूळ जरी 'अपेक्षा' हेच असले, तरी पुरुषांच्या बाबतीत या चिडचिडीचे स्वरूप आणि त्यामागची कारणमीमांसा थोडी वेगळी आणि अधिक गुंतागुंतीची असते.
लहानपणापासूनच मुलांच्या मनावर एक संस्कार बिंबवला जातो – "रडू नकोस, तू मुलगा आहेस!" किंवा "काय मुलींसारखा रडतोयस?" या वाक्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या नैसर्गिक मार्गावर कायमची बंदी घातली जाते. स्त्रिया रडून, बोलून किंवा मनातली घालमेल व्यक्त करून आपला ताण हलका करू शकतात; पण पुरुषांना मात्र 'खंबीर' दिसण्याच्या नादात स्वतःच्या भावनांचा गळा घोटायला शिकवले जाते. हीच 'संस्कारांची शिकवण' मोठेपणी त्यांना आतून पोकळ करू लागते.
कधी परिस्थितीमुळे तर कधी कौटुंबिक दबावामुळे, पुरुष खूप लवकर 'प्रगल्भ' (Mature) होतात. घराची जबाबदारी, पालकांचे आजारपण, पत्नीच्या इच्छा आणि मुलांचे भविष्य या चक्रात अडकलेला पुरुष आपली स्वतःची स्वप्ने कधी बाजूला सारतो, हे त्याचे त्यालाही कळत नाही. सर्वांच्या अपेक्षांचे ओझे वाहत असताना, त्याच्या खांद्यालाही कधीतरी आधाराची गरज असते, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.
पुरुषांची अपेक्षा फार मोठी नसते. त्यांना फक्त एवढंच वाटतं की, "मी न सांगताही कुणीतरी माझं थकलेलं शरीर आणि त्याहून अधिक थकलेलं मन ओळखावं." दिवसभर बाहेरच्या जगात संघर्ष करून जेव्हा तो घरी येतो, तेव्हा त्याला उपदेशाचे डोस नको असतात, तर फक्त एक शांत आणि समजूतदार साथ हवी असते. पण जेव्हा ही छोटीशी अपेक्षाही पूर्ण होत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर शेवटी 'रागात' होते.
या दबावाचे परिणाम:
आरोग्यावर परिणाम: मनात दाबलेला ताण ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि मानसिक नैराश्याला निमंत्रण देतो.
संवादाचा अभाव: बोलण्याऐवजी चिडचिड केल्यामुळे घरातील संवाद तुटतो आणि नात्यात कटुता येते.
एकाकीपण: ऐकून घेणारे अनेक असतात, पण 'समजून' घेणारे कोणी नसल्यामुळे तो स्वतःच्याच जगात एकटा पडतो.
पुरुषांची चिडचिड हा त्यांचा स्वभाव नसून, तो त्यांच्या हतबलतेचा हुंदका असतो. "काय बायकांसारखा रडतोयस?" असे म्हणून त्यांना हिणवण्यापेक्षा, "तू व्यक्त हो, मी ऐकतेय/आहे," म्हणणारा आधार त्यांना हवा असतो.
प्रत्येक चिडचिडीमागे एक न बोललेली गरज असते. पुरुष जेव्हा चिडतो, तेव्हा तो रागावलेला नसून प्रत्यक्षात तो 'थकलेला' असतो. त्याला गरज असते ती फक्त एका अशा हक्काच्या जागेची, जिथे तो आपले 'पुरुषत्व' बाजूला ठेवून एखादा क्षण शांतपणे विसावू शकेल.

- श्रद्धा मोने
व्हाळशी, डिचोली