परिपूर्णतेच्या शर्यतीत धावताना थोडा विराम घ्या, श्वास घ्या आणि स्वतःलाच विचारा, “मी माझ्यासाठी काय करत आहे?” कारण लक्षात ठेवा, ‘सुपरवुमन’ होण्यापेक्षा ‘समाधानी आणि निरोगी स्त्री’ होणे अधिक महत्त्वाचे आहे.

आजची स्त्री घर, करिअर आणि मातृत्व या तिन्ही आघाड्यांवर जबाबदाऱ्या पार पाडत आहे. सकाळी मुलांच्या डब्यापासून दिवसाची सुरुवात होते, त्यानंतर ऑफिसमधील कामे, घरातील व्यवस्थापन, वडीलधाऱ्यांची काळजी आणि पुन्हा मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी. या सगळ्यात ती स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हळूहळू विसरून जाते. “सगळं मीच करायला हवं” ही मानसिकता हळूहळू तिच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करू लागते. याच स्थितीला ‘सुपरवुमन सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा ‘सुपरवुमन सिंड्रोम’ केवळ भावनिक दृष्टिकोनातला प्रश्न नसून महिला आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय आहे.
‘सुपरवुमन सिंड्रोम’ म्हणजे काय?
हे खरे वैद्यकीय निदान नसले तरी एक मानसिक अवस्था आहे, ज्यात स्त्री स्वतःवर अवास्तव अपेक्षा लादते. यामधे पुढील गोष्टी घडतात,
हार्मोनल असंतुलन
सततचा मानसिक ताण शरीरातील कॉर्टिसोल या ताणहार्मोनची पातळी वाढवतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, पीसीओडीसारख्या समस्या वाढणे, वजनवाढ, केस गळणे व त्वचेच्या समस्या दिसून येतात. दीर्घकाळ ताण राहिल्यास प्रजनन आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
झोपेचा अभाव आणि थकवा
आई आणि नोकरी-व्यवसाय संबंधित दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांची झोप अपुरी राहते. यामुळे सतत थकवा जाणवणे, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड, डोकेदुखी हे दिसून येते. झोपेचा अभाव हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढवू शकतो.
मानसिक आरोग्य
‘सुपरवुमन’ होण्याच्या प्रयत्नात स्त्री स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करते. यामुळे चिंता विकार, नैराश्य, प्रसूतीनंतरचे नैराश्य वाढण्याची शक्यता, भावनिक थकवा (इमोशनल बर्न आऊट) हे त्रास उद्भवू शकतात. आई म्हणून “मी पुरेशी चांगली नाही” ही अपराधी भावना मानसिक ताण अधिक वाढवते.
हाडे आणि स्नायूंचे आरोग्य
सतत उभे राहणे, घरकाम, मुलांना उचलणे, ऑफिसमधील बसून काम करणे किंवा चुकीच्या पोस्चर मधे काम करणे यामुळे पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमतरता होऊ शकते. विशेष करून तिशी नंतर महिलांमध्ये व गर्भधारणे नंतरच्या काळात हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस) होण्याचा धोका वाढतो.
हृदयविकाराचा धोका
अतिताण, झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढ आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. दुर्लक्ष केल्यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा उशिरा कळून येतात.
आई म्हणून आरोग्याची विशेष काळजी
आई स्वतःला शेवटचे स्थान देते. परंतु निरोगी आईच निरोगी कुटुंब घडवू शकते. यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे.
उपाययोजना : आरोग्य प्रथम
समाजाची जबाबदारी
सोशल मीडियावर रंगवले जाणारे, नेहमी हसतमुख, मुलांसाठी सर्जनशील उपक्रम करणारी, करिअरमध्येही यशस्वी अशा ‘परफेक्ट मॉम’चे चित्र प्रेरणादायी असले तरी अनेक स्त्रियांमध्ये तुलना आणि कमीपणाची भावना निर्माण करते. यामुळे समाजही स्त्रीकडून अपेक्षा ठेवतो की तिने घर आणि करिअर दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळावे. पण घरातील जबाबदाऱ्या ह्या केवळ स्त्रीच्या नाहीत. तिच्या आरोग्याची काळजी घेणे ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. “ती आई आहे म्हणून तिनेच सगळे करावे” ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
‘सुपरवुमन’ होण्याच्या प्रयत्नात अनेक महिला स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करतात. पण निरोगी शरीर आणि
शांत मनाशिवाय कोणतीही भूमिका टिकवता येत नाही. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे सजगपणे पाहिले, तरच त्या कुटुंब आणि समाजासाठी दीर्घकाळ सक्षम राहू शकतील.
परिपूर्णतेच्या शर्यतीत धावताना थोडा विराम घ्या, श्वास घ्या आणि स्वतःलाच विचारा, “मी माझ्यासाठी काय करत आहे?”
कारण लक्षात ठेवा, ‘सुपरवुमन’ होण्यापेक्षा ‘समाधानी आणि निरोगी स्त्री’ होणे अधिक महत्त्वाचे आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर