वाचन: शिक्षकाचे सामर्थ्य आणि समृद्धीचा वारसा

प्रभावी शिक्षकासाठी वाचन हे केवळ ज्ञानार्जन नसून एक जगण्याची पद्धत आहे. स्वतः समृद्ध झाल्याशिवाय इतरांना शहाणे करणे अशक्य आहे, हा विचार मांडणारा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश.

Story: शिकता-शिकविता |
16th January, 10:15 pm
वाचन: शिक्षकाचे सामर्थ्य आणि समृद्धीचा वारसा

"जे जे आपणास ठावे, ते ते दुसऱ्यास शिकवावे | शहाणे करावे अवघे जन ||" - समर्थ रामदास

​वरील दिलेल्या समर्थ रामदासांच्या ओवीत खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ते म्हणतात, जे जे आपणास माहीत आहे ते दुसऱ्यांना शिकविले पाहिजे. शिक्षक पेशा हा याच तत्त्वावर आधारित आहे. वर्गात जाण्यासाठी पूर्वतयारी लागते आणि त्यासाठी शिक्षकाला वाचन खूप महत्त्वाचे असते. वाचनालय हे माझेही एक आवडते ठिकाण आहे; कारण तेथे विशाल ज्ञानाचा खजिनाच आहे.

​माझ्या अनुभवानुसार मला वाटते की, केवळ शिक्षक म्हणून नाही तर एक चांगला माणूस बनायचे असल्यास वाचनाशिवाय पर्याय नाही. माझी एक सवय म्हणजे मला पुस्तके जपून ठेवायला आवडतात. लग्नानंतर माहेरहून सासरी येताना मी अर्धा रिक्षा भरून पुस्तकेच घेऊन आले. माझे सासरे नेहमी म्हणतात, "केवढी ग तुझी ही पुस्तकं!", तेव्हा मी म्हणते, "पुस्तके हाच माझा खरा हुंडा" आणि ते मोठ्याने हसतात.

​खरंच, एक शिक्षक म्हणून वावरताना हातात पुस्तके आणि वाचनाचा छंद असलाच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, म्हणतात ना 'आडात असेल तरच पोहऱ्यात येणार'; तसेच जर डोक्यात ज्ञान नसेल तर मुलांना द्यायला उत्कृष्ट भाषा आणि विवेकी विचार कोठून येणार?

​मी नवीनच जेव्हा सहाय्यक प्राध्यापिका म्हणून शासकीय महाविद्यालयात रुजू झाले, तेव्हा वाचनानेच मला बळ दिले. तेव्हा मी फक्त चोवीस वर्षांची होते आणि मुले माझ्यापेक्षा केवळ दोन-तीन वर्षांनी लहान होती. तेव्हा शिकवताना थोडे जरी चुकले तरी मुले हसायची. पण मी प्रत्येक शब्दावर काळजी बाळगायची. जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी वाचनालयातच असायची. रात्री दोन वाजेपर्यंत एकाच विषयावर नऊ-दहा पुस्तके 'रेफर' करायचे. कामात कष्ट होते, पण वाचनाची ओढ असल्यामुळे ते खूप सोपे वाटायचे.

​त्या वेळी सात्तवीस वर्षांचा एक मुलगा, जो मुंबईहून शिकून आलेला होता, सावन नावाचा माझ्या वर्गात शिकायचा. त्यालाही वाचनाची आवड होती. तो नेहमी कोणत्यातरी विषयावर विरुद्ध प्रबंध मांडायचा. मी ही माझ्या वाचनाच्या बळावर त्याला प्रतिउत्तर द्यायची. हे मला शक्य झाले केवळ वाचनामुळेच. म्हणतात ना 'वाचाल तर वाचाल'. केवळ वरवर वाचन नाही, तर वाचून त्यावर विचार करणे आणि ते चांगले विचार अमलात आणणे तेवढेच महत्त्वाचे असते.

​आज तर अनेक वाचनालये 'ई-बुक्स'ची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आपल्या मोबाईल नावाच्या मित्रामुळे तर आपण कोणतेही पुस्तक फक्त एका क्लिकवर वाचू शकतो. पण आजचे कटू सत्य म्हणजे, आजच्या युवा पिढीला वाचनाचा जाम कंटाळा येतो. फेसबुक, व्हॉट्सॲपवर फालतू विनोद आणि संदेश पाठविण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर उत्तम वाचन करून ज्ञान प्राप्त करण्यासाठी करता येईल.

​शिक्षकाने वाचन हा छंद म्हणून जोपासावा; वाचनातून खूप काही साध्य होऊ शकते. एक उदाहरण म्हणजे बिहारचा सुशील कुमार हा अत्यंत गरीब मुलगा केवळ वाचनामुळेच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये करोडपती बनू शकला.

​वाचन संस्कृती जपण्यासाठी मी माझ्या तासाला जाताना मुलांना नेहमी नवनवीन पुस्तके सुचवते. 'बुक रिव्ह्यू' (पुस्तक परिचय) सारखे उपक्रम आपण मुलांसाठी राबवू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात 'पुस्तक बिसी' सुरू करू शकतो, ज्यात पुस्तकांची देवाणघेवाण होऊ शकेल. मुलांना वेगवेगळ्या वाचनालयांना भेटी द्यायला लावणे, पुस्तक वाचून आपला अनुभव वर्गात सांगायला सांगणे, अशा अनेक कृतीयुक्त पद्धती आपण राबवून वाचन हे चित्तवेधक बनवू शकतो. पुस्तकांशी मैत्री एक शिक्षक मुलांना अत्यंत सोप्या मार्गाने घडवू शकतो.


श्रुती करण परब