जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या प्रगतीत संगणक तंत्रज्ञानाचा वाटा सिंहाचा आहे. 'सुपर कम्प्युटर' निर्मितीच्या आव्हानात्मक प्रवासात डॉ. सुनीता महाजन यांनी दिलेले योगदान हे भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.

आजच्या युगात आपण 'स्मार्ट' तंत्रज्ञानाने वेढलेले आहोत. आपल्या खिशात असलेला स्मार्टफोन हा प्रत्यक्षात एका 'मिनी कॉम्प्युटर'सारखाच काम करतो. जगाच्या पाठीवरची कोणतीही माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. मात्र, १९६० आणि ७० च्या दशकात जेव्हा संगणक तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते, तेव्हाची परिस्थिती आजच्यासारखी सोपी नव्हती. त्यावेळी संगणक हे केवळ साधे यंत्र नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे आणि लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानले जात होते. याच काळात भारतीय विज्ञान विश्वात एका स्त्रीने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला संगणकीय क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न पाहिले, त्या महान शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. सुनीता महाजन.
डॉ. सुनीता महाजन यांचा प्रवास १९६९ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्या 'भाभा अणुसंशोधन केंद्रात' (BARC) वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाल्या. हे तेच केंद्र आहे जिथे भारताच्या भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी होत होती. डॉ. महाजन यांनी २००० सालापर्यंत येथे अत्यंत मोलाचे काम केले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता 'सुपर कम्प्युटर आणि पॅरलल कम्प्युटिंग' (समांतर प्रक्रिया तंत्रज्ञान). १९९० च्या दशकात भारताला अत्यंत वेगवान संगणकाची गरज भासू लागली होती. मात्र, जागतिक राजकारणामुळे भारताला अद्ययावत तंत्रज्ञान मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत स्वदेशी बनावटीचा सुपर कम्प्युटर तयार करणे हे एक मोठे आव्हान होते.
डॉ. महाजन यांच्या नेतृत्वाखाली १९९० मध्ये 'अनुपम' हा भारताचा स्वदेशी समांतर संगणक विकसित करण्यात आला. सुपर कम्प्युटर म्हणजे नेमके काय? तर जेव्हा एक अतिशय वेगवान संगणक घेण्याऐवजी अनेक संगणक एकमेकांना जोडून, त्यांच्याकडून एकाच वेळी एक काम करून घेतले जाते, त्याला समांतर प्रक्रिया तंत्रज्ञान म्हणतात. डॉ. महाजन यांनी १६, ३२ आणि ६४ अशा क्रमाने संगणक जोडून, मूळ 'फोरट्रान' या संगणकीय भाषेमध्ये आवश्यक बदल केले. अनेक 'चिप्स'मध्ये समन्वय साधून त्यांच्यात सुरळीत संवाद घडवून आणणे हे सर्वात कठीण काम होते, जे डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमने यशस्वी करून दाखवले.
या संशोधनाचे सर्वात मोठे फळ देशाला 'तेजस' या लढाऊ विमानाच्या निर्मितीच्या वेळी मिळाले. लढाऊ विमानाच्या रचनेत प्रत्येक लहान भागाचे डिझाइन अचूक असणे आवश्यक असते. विमानाच्या इंजिनला हवा पुरवणारी 'वाय' (Y) आकाराची एक विशेष नळी असते. १९९१ मध्ये या नळीचा एक प्रोग्रॅम तयार करायला साधारण २१ दिवस लागायचे. जर त्यात काही चूक झाली, तर पुन्हा २१ दिवस खर्ची पडायचे. मात्र, डॉ. महाजन यांनी विकसित केलेल्या 'अनुपम' संगणकामुळे हेच काम अवघ्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होऊ लागले. पुढे जेव्हा संगणकाची गती आणखी वाढली, तेव्हा हे काम चक्क तीन ते चार मिनिटांत होऊ लागले. या गतीमुळेच 'तेजस' विमानाची निर्मिती प्रक्रिया सुलभ झाली आणि ते भारतीय हवाई दलात दाखल होऊ शकले.
निवृत्तीनंतरही डॉ. महाजन यांचे कार्य थांबलेले नाही. त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले आणि नव्या पिढीला तंत्रज्ञानाचे धडे दिले. सध्या त्या मुंबईतील शंभर वर्षांहून जुन्या असलेल्या 'वुमन ग्रॅज्युएट युनियन'मध्ये कार्यरत आहेत, तसेच 'इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन'मध्येही त्या सक्रिय आहेत. तिथे त्या आजही संगणक विभाग हाताळण्यासोबतच तरुणांना मार्गदर्शनाचे काम करतात. "वाचाल तर वाचाल" असे आपण म्हणतो, पण डॉ. महाजन यांच्या आयुष्याकडे पाहिले की जाणवते की, "वाचाल आणि सखोल संशोधन कराल, तरच जगावर ठसा उमटवाल." एका जिद्दी महिलेने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिलेले हे योगदान देशाच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रेरक ठरेल.

- स्नेहा सुतार