सिम्पल सिम्पल लाईफ!

धावपळीच्या जगात साधेपणाची ओढ सर्वांनाच असते, पण तो स्वीकारणे कठीण का वाटते? साधेपणा म्हणजे निष्क्रियता नसून, अनावश्यक गुंतागुंत सोडून स्वतःचा शोध घेणारी एक परिपक्व निवड आहे.

Story: मनी मानसी |
16th January, 10:00 pm
सिम्पल सिम्पल लाईफ!

आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, “मला फक्त शांत, साधं आयुष्य हवं आहे... 'सिंप्लीसिटी इज द बेस्ट' (Simplicity is the best)..." वगैरे.

​परंतु प्रत्यक्षात जेव्हा साधेपणाची वेळ येते, तेव्हा मन गोंधळून जातं, घाबरतं. का? कारण, कमी वेग, कमी गडबड, कमी लोक, कमी अपेक्षा, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण स्वीकारायला अवघड असतं. अशा वेळी मग असा प्रश्न पडतो की, साधेपणा हा खरंच कठीण आहे का, की आपणच त्याला चुकीचा अर्थ देत आहोत?

​आजचा काळ हा “जास्त” या विशेषणाला महत्त्व देणारा आहे. जास्त काम, जास्त यश, जास्त संपर्क, जास्त अनुभव. सतत व्यस्त असणं म्हणजे खूप यशस्वी असणं, असं नकळत शिकवलं जातं. त्यामुळे “सध्या काय चाललंय?” असा साधासा नेहमीचा प्रश्न साधा न राहून, आपल्या आयुष्याची किंमत मोजणारा बनतो. अशा वातावरणात साधं जगणं म्हणजे मागे राहणं, क्षमता वाया घालवणं किंवा महत्त्वाकांक्षा नसणं, अशी समजूत तयार होते.

​यामागे मेंदूचाही मोठा वाटा आहे. आजचा मेंदू सतत उत्तेजनाला सामोरा जातो. मोबाईलवरील सूचना, समाजमाध्यमं, बातम्या, संदेश. या सगळ्यामुळे मेंदूला विश्रांतीच मिळत नाही. अशा वेळी शांतता किंवा रिकामेपणा अस्वस्थ करणारा वाटतो. साधेपणा म्हणजे “काहीच चालू नाही” असं वाटतं, आणि ते टाळावंसं वाटतं.

​दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओळख. अनेक माणसं आपली ओळख आपल्या कामगिरीशी जोडून घेतात. “मी कोण आहे?” याचं उत्तर “मी काय साध्य केलं?” याच्याशी जोडून पाहिलं जातं. अशा वेळी साधेपणा स्वीकारणं म्हणजे स्वतःची ओळख धूसर होण्याची भीती वाटते. जर मी कमी केलं, कमी धाव घेतली, तर माझं समाजातील मूल्य देखील कमी होईल का, हा प्रश्न मनात घोळतो.

​खरंतर, समाजमाध्यमांमुळे ही अडचण आणखी वाढते. इतरांचं आयुष्य सतत अधिक रंगीत, अधिक यशस्वी, अधिक ‘पूर्ण’ दिसत राहतं. त्याच्या तुलनेत आपलं साधं आयुष्य अपुरं वाटू लागतं. इथे FOMO (Fear of Missing Out) म्हणजे केवळ अनुभव चुकण्याची भीती नसते, तर “मी चुकीचं आयुष्य जगतोय का?” ही खोल भीती असते.

​म्हणूनच इथे साधेपणा म्हणजे काय नाही, हे स्पष्ट करणं जास्त गरजेचं आहे. साधेपणा म्हणजे निष्क्रियता नाही, महत्त्वाकांक्षा सोडणं नाही किंवा जबाबदाऱ्या झटकणं नाही. उलट, साधेपणा म्हणजे अनावश्यक गुंतागुंत कमी करणं आणि आवश्यक गोष्टींना जागा देणं. कमी, पण अर्थपूर्ण निवडी करणं.

​संशोधन सांगतं की साध्या, कमी उत्तेजन असलेल्या जीवनशैलीमुळे मानसिक थकवा कमी होतो, निर्णयक्षमता सुधारते आणि भावनिक संतुलन वाढतं. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेली विश्रांती मिळते. स्वतःच्या खऱ्या गरजा आणि मर्यादा स्पष्ट दिसू लागतात. ​पण मग साधेपणापासून आपण का बरं पळतो?

कारण साधेपणाच्या शांततेत आपले न व्यक्त झालेले प्रश्न दत्त म्हणून आपल्यासमोर उभे ठाकतात. अपूर्णता, दुःख, न जगलेली स्वप्नं हे सगळं मनाला टोचू लागतं. यात हाच मनातला आपला गोंधळ कधी कधी स्वतःपासून पळण्याचा एक सोपा मार्ग बनून बसतो.

​आजच्या काळात साधेपणा स्वीकारणं म्हणजे समाजाच्या अपेक्षांना जाणीवपूर्वक प्रश्न विचारणं. “सगळं करायलाच हवं” या विचारातून बाहेर येणं, ‘पुरेसं’ या संकल्पनेशी मैत्री करणं, डिजिटल गोंगाट कमी करणं आणि स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं.

​लक्षात ठेवा, साधेपणा ही काही एक सोपी निवड नाही, पण ती एक परिपक्व निवड आहे. गोंधळाच्या जगात शांतता निवडणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नव्हे; तर ते स्वतःची निवड करणं होय. आणि आजच्या अस्थिर जगात, स्वतःकडे परत येणं हीच खरी प्रगती आहे.


मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४