प्रसूतीनंतर शरीराची ठेवण का बदलते?

प्रसूतीनंतर हार्मोनल बदल आणि वाढलेल्या वजनामुळे शरीराची ठेवण (पोश्चर) बदलते. हे बदल नैसर्गिक असले तरी, योग्य व्यायाम आणि काळजी घेतल्यास शरीर पुन्हा सुदृढ व पूर्ववत होऊ शकते

Story: आरोग्य |
16th January, 09:53 pm
प्रसूतीनंतर शरीराची ठेवण का बदलते?

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि बदलांनी भरलेला टप्पा असतो. मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक बदल घडून येतात. बाळाच्या वाढीसाठी आणि जन्मासाठी शरीर स्वतःला त्या बदलांशी जुळवून घेत असते. त्यामुळे प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांमध्ये शरीराची ठेवण म्हणजेच पोश्चर बदललेले दिसून येते. हा बदल नैसर्गिक असला तरी त्यामागची कारणे समजून घेणे आणि त्यामुळे शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

​सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, गर्भधारणेदरम्यान पोटाचा आकार आणि वजन हळूहळू वाढते. या वाढलेल्या वजनामुळे शरीराचा तोल राखण्यासाठी पाठीचा कणा पुढे झुकतो. कंबरेच्या खालच्या भागावर अधिक ताण येतो आणि पाठीच्या कण्याचे नैसर्गिक वळण बदलते. यासोबत खांदे पुढे झुकणे, मान पुढे येणे, पाठीच्या खालच्या भागावर अधिक ताण येणे असे बदल दिसून येतात. प्रसूतीनंतर लगेचच हे बदल पूर्ववत होत नाहीत, त्यामुळे शरीराची ठेवण काही काळ बदललेली 

राहते.

​दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. गर्भधारणेदरम्यान ‘रिलॅक्सिन’ नावाचे हार्मोन स्त्रवले जाते, जे सांधे आणि स्नायूंना सैल करते. यामुळे प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होते. पण प्रसूतीनंतरही काही काळ हे हार्मोन शरीरात सक्रिय राहते. त्यामुळे सांधे कमकुवत वाटतात आणि योग्य आधार न मिळाल्यामुळे पोश्चर बिघडू शकते.

​प्रसूतीनंतर पोटाच्या स्नायूंमध्ये कमजोरी येणे हेही एक मोठे कारण आहे. अनेक महिलांमध्ये पोटाचे सरळ असलेले रेक्टी स्नायू कमकुवत असल्यास, ते ताणले गेल्याने स्नायूंमध्ये अंतर निर्माण होते, ज्याला 'डायस्टॅसिस रेक्टी' म्हणतात. यामुळे शरीराला योग्य आधार मिळत नाही आणि पाठीवर जास्त ताण येतो. परिणामी पाठ वाकलेली राहू शकते किंवा पुढे झुकण्याची सवय लागते.

​याशिवाय, बाळाची काळजी घेताना होणारी शारीरिक हालचालही पोश्चरवर परिणाम करते. सतत बाळाला उचलणे, झोपेचा अभाव, स्तनपान करताना पुढे झुकून बसणे, किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभे राहणे यामुळे मान, खांदे आणि पाठ यावर ताण येतो. अनेकदा नवीन आई स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून फक्त बाळाकडे लक्ष देते, ज्याचा परिणाम शरीराच्या ठेवणीवर होतो. मानसिक आणि शारीरिक थकवाही यामध्ये भर घालतो. प्रसूतीनंतरचा ताण, जबाबदाऱ्या आणि थकवा यामुळे शरीर सैल पडते आणि योग्य पोश्चर राखण्याकडे दुर्लक्ष होते.

​प्रसूतीनंतर शरीराची ठेवण बदलणे हे नैसर्गिक असले तरी ते दीर्घकालीन समस्यांचे रूप घेऊ नये व कायमस्वरूपी होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. काही सोप्या उपाययोजना अवलंबून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पोश्चर सुधारले जाऊ शकते, शरीर पूर्ववत होऊ शकते आणि वेदना टाळता 

येतात.

​पोश्चर सुधारण्यासाठी उपाय:

​१. योग्य बसण्याची आणि उभे राहण्याची सवय: पाठ सरळ ठेवून बसणे, खांदे सैल ठेवणे आणि मान ताठ ठेवणे आवश्यक आहे.

२. हलके व्यायाम व योग: डॉक्टरांच्या सल्ल्याने 'पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज', 'बॅक स्ट्रेंथनिंग' आणि योगासने करावीत.

३. स्तनपान करताना योग्य पोश्चर: उशीचा आधार घेऊन बाळाला जवळ ठेवावे, स्वतः पुढे झुकू नये.

४. बाळ उचलताना काळजी: कंबरेतून न वाकता गुडघे वाकवून बाळ उचलावे.

५. पुरेशी विश्रांती व संतुलित आहार: शरीराच्या पुनर्बांधणीसाठी विश्रांती आणि पोषण महत्त्वाचे आहे.

​आईचे आरोग्य सुदृढ असेल तरच ती बाळाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकते, म्हणून प्रसूतीनंतर स्वतःच्या शरीराची काळजी घेणे व शरीराची ठेवण योग्य ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर