मातृत्व म्हणजे एका नव्या जीवाचा आणि नव्या स्वतःचा जन्म. हा सुंदर प्रवास सुखकर व्हावा, यासाठी डॉ. पूनम संभाजी यांनी आहार, प्रसूतीपूर्व तयारी आणि बाळाची काळजी याबद्दल दिलेला हा अमूल्य मार्गदर्शक सल्ला.

आई होणे हा आनंदाचा पण जबाबदारीचा नवा प्रवास आहे. या प्रवासात स्वतःचे आरोग्य, स्तनपान आणि बाळाची सुरक्षितता जपण्यासाठी डॉ. पूनम संभाजी यांनी दिलेले हे मोलाचे मार्गदर्शन नव्या मातांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.
आई होणे म्हणजे आयुष्यातील एक अतिशय सुंदर, भावनिक आणि बदल घडवणारा टप्पा. बाळाच्या जन्मानंतर आनंदासोबतच अनेक प्रश्न, थोडी भीती आणि नव्या जबाबदाऱ्या मनात येतात. “मी बाळाची योग्य काळजी घेऊ शकेन का?”, “दूध पुरेसं येईल का?”, “बाळ नीट खातंय का?” असे प्रश्न प्रत्येक नव्या आईच्या मनात असतात. या सगळ्या भावना अगदी नैसर्गिक आहेत.
बाळाच्या जन्मानंतरचे पहिले काही दिवस आई-बाळ दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात आईने स्वतःकडेही तितक्याच प्रेमाने लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेशी विश्रांती, शांत झोप (जेव्हा शक्य असेल तेव्हा), संतुलित आहार आणि सकारात्मक वातावरण यामुळे आईचे शरीर आणि मन दोन्ही सावरायला मदत होते.
आईच्या दुधाला पर्याय नाही. जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे बाळासाठी अत्यंत फायदेशीर असते. पहिल्या दुधाला ‘कोलोस्ट्रम’ म्हणतात. हे बाळासाठी पहिलं लसीकरणच असतं. बाळाला स्तनपान देताना आई आरामात बसलेली असावी, बाळाची मान व पाठ नीट आधारलेली असावी आणि बाळाने स्तनाचा मोठा भाग तोंडात घेतलेला असावा. सुरुवातीला थोडा त्रास, निपल दुखणे किंवा शंका येऊ शकतात. अशावेळी संकोच न करता डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांची मदत घ्यावी.
नवजात बाळाच्या लघवी-शौच पॅटर्नकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
पहिल्या २४ तासांत बाळ लघवी करेलच असे नाही, पण हळूहळू लघवीचे प्रमाण वाढत जाते. पहिल्या काही दिवसांत काळसर चिकट शौच (मेकोनियम) येते, नंतर ती पिवळसर होते. हे सर्व सामान्य आहे.
बाळ झोपेत असताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. बाळाला पाठीवर झोपवावे, उशी किंवा जाड चादरी टाळाव्यात. आई-बाळ एकत्र झोपल्यास स्तनपान सोपे होते आणि भावनिक नाते घट्ट होते, पण बाळाचा चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी. बाळाची पहिली तपासणी जन्मानंतर पहिल्याच आठवड्यात बालरोगतज्ज्ञांकडे करणे आवश्यक आहे. या भेटीत वजन, स्तनपान, कावीळ, लसीकरण याबाबत मार्गदर्शन मिळते. काही अडचण वाटल्यास जसे की बाळ दूध न पिणे, खूप झोपणे, ताप, श्वास घेण्यास त्रास, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आई होणे म्हणजे परिपूर्ण असणे नाही, तर शिकत-शिकत पुढे जाणे आहे. मदत मागणे ही कमजोरी नाही, तर शहाणपण आहे. आई आनंदी आणि शांत असेल, तर बाळही सुरक्षित आणि समाधानी वाढेल.

डॉ. पूनम संभाजी
बालरोगतज्ज्ञ
(Pediatrician) MBBS, DCH, PGPN, IYMC