बी.एड. करत असताना आदिवासी पाड्यांवर सेवाकार्य करणाऱ्या लेखिकेची गाठ चक्क एका फ्रेंच कृष्णभक्ताशी पडते. सर्व सुखांचा त्याग करून गीतेचा प्रचार करणाऱ्या मार्था माईंचा हा थक्क करणारा प्रवास अंतर्मुख करणारा आहे.

बीएड. करताना मला खूप चांगले शिक्षक मिळाले. आमची एकूण बॅचसुद्धा हुशार आणि मेहनती मुलांची होती. मोठेपणा नाही, पण असे सहकारी विद्यार्थी मिळायलाही भाग्य लागते. सेवा सदनमधील आमचे शिक्षक हे नुसते शिक्षकच नव्हते, तर स्वतः एक पुस्तक होते. प्रत्येक जण आपापल्या विषयात पारंगत आणि अनुभवी होता. नुसते शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक कार्यातही त्यातील बरेचसे अग्रेसर होते. कदाचित माझ्या हातून जे काही थोडे समुपदेशन (कौन्सिलिंग) म्हणा किंवा आदिवासी पाड्यांवर केलेली शैक्षणिक जागृती म्हणा, त्याचा पाया येथूनच घातला गेला.
आमच्या मुख्याध्यापिका सौ. पालशेतकर मॅडम तर यात सगळ्यात पुढे होत्या. आमची तुकडी त्यांच्या खास आवडीची होती. कॅम्पच्या निमित्ताने आम्ही बऱ्याचदा मुंबईच्या आसपास असलेल्या आदिवासी गावांत जायचो. तिथे आश्रमशाळा सुरू करून द्यायचो. अर्थात, त्याविषयी आधी मी लिहिलेही आहे आणि आजच्या लेखाचा तो विषयही नाही.
सांगायचे तर, एकदा असेच आम्ही एका गावात गेलो होतो, तिथे दोन दिवसांचा मुक्कामच होता. पंचायत ऑफिसमध्ये बसलो असताना सरपंच आले आणि आम्हाला म्हणाले, "चला, जरा फिरून येऊया. आज मी तुम्हाला एका वेगळ्याच व्यक्तीशी ओळख करून देतो." मी म्हटले, "कोण आता नवीन? असतील कोणी नवीन अवतरलेले साधुबाबा किंवा एखादा स्वयंभू आदिवासी नेता!" आम्हाला तसे फारसे अप्रूप नव्हते, पण सरपंच म्हणतात तर बघू तरी कोण आहे ते.
जीपने थोडे अंतर गेल्यावर एका घरासमोर आम्ही उतरलो. छोटेसे टुमदार घर, आसपास गर्द झाडी, फुलझाडे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तिथे असलेली स्वच्छता. ती आसपासच्या पाड्यांवर कधीच दिसत नसे. माझ्या मेंदूचे 'अँटेना' जरासे उभे झाले. चप्पल काढून आत गेलो. शांत, धीरगंभीर वातावरण, बारीक आवाजात गीतेचे स्वर, शेणाने स्वच्छ सारवलेली जमीन; अगदी साधा घरगुतीपणा होता. आत गेल्यावर स्वागत झाले, "सुस्वागतम!" अहो! अगदी शुद्ध मराठीत? कारण काय माहिती आहे? स्वागत करणारी स्त्री चक्क परदेशी होती. अगदी गोरीपान, सोनेरी केस, अंगात साधा सुती पंजाबी ड्रेस आणि वय साधारण पंचेचाळीस वर्षे.
सरपंचांनी ओळख करून दिली, "ह्या मार्था रिनो. आम्ही सगळे यांना 'मार्था माई' म्हणून हाक मारतो." भेट झाली, खरेच दिलखुलास व्यक्तिमत्त्व! त्यांनी आमचा आदरसत्कार चांगला केला. उकडलेली कंदमुळे आणि गवती चहा आमच्यासमोर आला. खरे सांगू, त्या प्रसन्न वातावरणात त्याची चव काही वेगळीच लागली. मार्था माईंबद्दल मनात जिज्ञासा जागृत झाली. सरपंचांनी आमच्या तोडक्या-मोडक्या कार्याची ओळख त्यांना करून दिली. माई खूप खुश झाल्या. त्या दिवशी जेमतेम दोन तास एकत्र होतो, पण आम्ही कायमचे मित्र आणि सहकारी झालो.
मार्था माई मूळच्या फ्रेंच. त्या कृष्णभक्त होत्या. आदिवासी पाड्यांवर तसेच गावागावात त्या गीतेवर प्रवचन करत असत. खरंच, एक परदेशी स्त्री सर्व सोयी-उपभोग सोडून या जंगलात राहते आणि चक्क गीतेचा प्रसार करते, हे पाहून सगळेच अचंबित झाले. आम्ही ख्रिस्ती मिशनरी खूप पाहिले होते, गोव्यात तर खूपच; पण एक परदेशी स्त्री हिंदू धर्माचा उदो-उदो करते, हे प्रथमच पाहत होतो. असो! हळूहळू मार्था माईंची ओळख वाढू लागली, आमची मैत्रीच झाली म्हणा ना.
मार्था एक फ्रेंच मुलगी, अगदी अस्सल कॅथोलिक कुटुंबातील. आई-वडील उच्चभ्रू घरातील, भरपूर पैसा आणि जमीनजुमला. वडील सतत पार्ट्या आणि समारंभ यात व्यस्त असायचे, आईसुद्धा थोडीफार तशीच होती; पण त्यांच्या संस्कृतीनुसार ते योग्य होते. मार्था अशा वातावरणात वाढली असली तरी तिची शैक्षणिक कारकीर्द चांगली होती. घरात काळजी घ्यायला नोकर-चाकर होते, सतत पार्ट्या चालत असत. श्रीमंती अगदी उतू जात होती. दुसरी एखादी मुलगी असती तर वाहवत गेली असती, इतका पैसा हातात होता. लहानपणापासूनच मार्था जरा वेगळी होती. हसरी आणि खेळकर जरूर होती, तारुण्यसुलभताही होती, पण तिचे विचार वेगळे होते. हा पैसा, डामडौल, प्रसिद्धी याचा तिला सोस नव्हता; उलट ती अशा गोष्टींच्या विरोधातच जाऊ लागली.
त्याच वेळी तिच्या आयुष्यात एक भारतीय शिक्षक आले, जे तिच्याच महाविद्यालयात शिकवत असत. मार्थाचे वेगळेपण त्यांनी हेरले. ते शिक्षक भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मार्थाला मार्ग दाखवला. तिला गीता आणि महाभारताची ओळख करून दिली. झगमगाटाला कंटाळलेल्या मार्थाला हा मार्ग आवडला. सर्व सोडून ती भारतात आली. मुंबईत 'हरे राम हरे कृष्ण' मंदिरात राहिली, साध्वी झाली. तिने गीतेचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यासाठी चक्क हिंदी भाषा शिकली. हुशार मार्था आता अनेकांच्या नजरेत भरू लागली. तिला प्रवचनांसाठी आमंत्रणे येऊ लागली, त्यात परदेशी आमंत्रणेही असत; पण मार्थाचा मार्ग वेगळा होता.
ती सर्व सोडून चक्क आदिवासी आणि ग्रामीण भागात राहू लागली. शिक्षणाबरोबरच तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार केला, जे आम्हालाही जमले नाही; नव्हे, आम्ही विचारही केला नाही. ते कार्य एक परदेशी स्त्री प्रामाणिकपणे करत होती. आजही तिचे काम चालूच आहे. वारशाने मिळालेल्या संपत्तीचा तिने ट्रस्ट केला असून त्यातून ती ग्रामीण मुलांच्या शाळांमध्ये हिंदू तत्त्वज्ञान आणि गीतेचा प्रसार करते. हल्लीच फोन केला होता, तेव्हा ती भगवद्गीतेतील सामाजिक मूल्ये आणि शिकवणीवर फ्रेंच भाषेत लेखन करत होती. बघा ना, कुठली ही मार्था, हजारो किलोमीटरवरून आली, खेड्यापाड्यांत फिरते आणि भगवद्गीतेवर प्रबंध लिहिते! आणि आम्ही? साधा 'भगवद्गीता' हा शब्द तरी किती जणांना शुद्ध लिहिता येतो? नाही...

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.