अनुभवातून आलेले शहाणपण

"मुलांना आपल्यापेक्षाही जास्त येते आणि आपण त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो," हा माझा ठाम विश्वास आता तयार झाला आहे; ज्याची प्रचिती मला वेळोवेळी वर्गात येत असते.

Story: शिकता-शिकविता |
09th January, 11:57 pm
अनुभवातून आलेले शहाणपण

“शिक्षण देणे म्हणजे भविष्याला दिशा देणे.” — डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

​शिक्षण म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती शाळा आणि वर्गात शिकवणारा शिक्षक. गेल्या पाच वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यातीलच काही प्रसंग मी इथे मांडू इच्छिते, ज्याचा उपयोग माझ्यासारख्याच इतर नवीन शिक्षकांना नक्कीच होईल.

​एक शिक्षिका म्हणून वर्गात जाताना, "मला सर्व येते आणि मुलांना काहीच येत नाही," हा खोटा आत्मविश्वास बाळगून कधीही वर्गात प्रवेश करू नये. माझ्या पहिल्याच अनुभवातून मी हे शिकले.

​कुठेतरी म्हटले आहे की, 'गर्वाचे घर खाली'. त्या वेळी मी बी.एड.ची विद्यार्थिनी होते आणि इंटर्नशिपसाठी एका कॉन्व्हेंट शाळेत गेले होते. शिकवण्याची उमेद होती आणि पाचवीचा वर्ग असल्याने काम खूप सोपे वाटले. त्या दिवशी मोठ्या तयारीने मी इंग्रजीचा धडा शिकवायला घेतला. मधल्या सुट्टीनंतरचा तो तास होता. सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मी मोठ्याने ओरडून सर्वांना 'लर्निंग मोड'मध्ये आणले.

​मी उत्साहाने धडा शिकवला. ४५ मिनिटांचा तास होता, पण मी अर्ध्या तासातच सर्व शिकवून पूर्ण केले. "मुलांना सर्व समजले आहे," याचा मला गर्व वाटू लागला. धड्यावर आधारित उलटसुलट अनेक प्रश्न मी मुलांना विचारले. मुले हुशार होती, त्यांनी उत्तम उत्तरे दिली. आता तासाची शेवटची १५ मिनिटे उरली होती, म्हणून मी मुलांशी गप्पा मारण्याचे ठरवले.

​तेवढ्यात एक चुणूकदार मुलगी उठली आणि म्हणाली, "टीचर, तुला पिझ्झा हवाय का?" मी म्हटले, "अगं, सुट्टी तर संपली ना आता?" ती पटकन एखाद्या वेटरप्रमाणे हात करून माझ्यापाशी आली आणि म्हणाली, "टीचर हा घे पिझ्झा, एक तुकडा घे ना!" मला काय चालले आहे हे कळेना, बाकीची मुले आपापसात कुजबुजू लागली. खरं तर, तो कार्डबोर्डपासून बनवलेला पिझ्झाचा हुबेहूब नमुना होता. त्या वेळी माझ्या लक्षात आले की मुले आपल्यापेक्षाही कितीतरी जास्त सर्जनशील असतात, फक्त त्यांना योग्य संधी देण्याची गरज असते.

​त्यानंतर मी वर्ग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या अति-आत्मविश्वासाचे बिंग एका छोट्याशा मुलाने फोडले. तो मला म्हणाला, "टीचर, तुम्ही आम्हाला एवढे प्रश्न विचारले आणि आम्ही बरोबर उत्तरे दिली, आता मी एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही सांगा." मला वाटले, पाचवीचा मुलगा मला काय विचारणार? मी आत्मविश्वासाने त्याला विचारण्यास सांगितले. तो डोके खाजवत माझ्या जवळ आला आणि हातातील एक वस्तू दाखवून विचारले, "याला काय म्हणतात?"

​त्याच्या हातात संगणकाचा एक छोटासा भाग होता. तो काय होता, हे मला ठाऊक नव्हते. त्या ५२ मुलांच्या वर्गात मी पूर्णपणे 'ब्लँक' झाले. मी गप्प आहे हे पाहून मुले हसू लागली. त्या एका क्षणाने मला शिकवले की, "मला सर्व येते आणि मुलांना काही येत नाही," हे गृहीत धरणे किती चुकीचे आहे. 

तेवढ्यात तास संपल्याची घंटा कानावर आली. मी त्या मुलाला म्हणाले, "याला काय म्हणतात हे मी तुला नक्की शोधून सांगेन." तो तुकडा हातात घेऊनच मी वर्गाबाहेर आले. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या, कारण माझ्या अतिशहाणपणामुळे वर्गात माझी एक प्रकारे नाचक्कीच झाली होती. तिथेच माझी बी.एड.ची एक चांगली मैत्रीण भेटली. मी तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ती म्हणाली, "अगं, यात घाबरण्यासारखं काय आहे? चल आपण शोधूया."

​आम्ही लगेच शाळेच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये गेलो आणि तो तुकडा तिथल्या संगणक शिक्षिकेला दाखवला. त्यांनी सांगितले की, तो एक लहानसा 'चिपसेट' (Chipset) आहे आणि त्याचा उपयोगही समजावून सांगितला. तीच माहिती मी दुसऱ्या दिवशी वर्गात जाऊन त्या मुलाला आणि संपूर्ण वर्गाला दिली. सर्व विद्यार्थी खुश झाले आणि मलाही एक प्रकारचे समाधान मिळाले. "मला सर्व येते" हा मी बाळगलेला खोटा अहंकार त्या क्षणी पूर्णपणे गळून पडला.

​त्यानंतर त्या वर्गातील मुले माझ्याशी खूप आपुलकीने वागू लागली. कारण आता मी त्यांच्या प्रश्नांना कंटाळून त्यांना गप्प न करता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागले होते. वर्गात असताना विद्यार्थ्यांच्या मनात अशीच जिज्ञासू वृत्ती असावी, असे मला नेहमी वाटते. महत्त्वाचे म्हणजे, "मुलांना आपल्यापेक्षाही जास्त येते आणि आपण त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो," हा माझा ठाम विश्वास आता तयार झाला आहे; ज्याची प्रचिती मला वेळोवेळी वर्गात येत असते.


- श्रुती करण परब