शब्दांची सलामी कष्टकरी हातांना!

समाजाचा डोलारा पेलणाऱ्या कष्टकरी हातांची कृतज्ञता व्यक्त करणारा हा लेख. जवान, पोलीस, अग्निशामक आणि कुरिअर बॉईज यांसारख्या पडद्यामागच्या नायकांना लेखिकेने दिलेली ही मनापासूनची 'शब्दांची सलामी' आहे.

Story: ललित |
09th January, 10:43 pm
शब्दांची सलामी कष्टकरी हातांना!

आयुष्य म्हणजे कष्टाने भरलेले सोनेरी क्षण, हास्याचे, दुःखाचे आणि सहवासात गुंफलेले एक अनोखे बंधन.

खरंच... आयुष्य म्हणजे कष्टाचे फळ. कष्ट केल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही आणि अन्नाला चव नाही. प्रत्येक माणूस, मग तो छोटा असो किंवा मोठा, प्रत्येकासाठी कष्ट करणे ही एक जबाबदारी असते. आई-वडील कष्ट करून मुलाबाळांना वाढवतात; नंतर मुले ही जबाबदारी स्वीकारतात आणि अशा प्रकारे जीवनाचे चक्र चालू राहते.

प्रत्येक व्यक्ती, मग ती वृद्ध असो, पुरुष असो वा स्त्री, मुलगा असो वा मुलगी; आपापल्या पद्धतीने कष्टाची कामे करून जीवन जगत असते. या कष्टकरी दुनियेत आपल्या देशाचे जवान, पोलीस अधिकारी, अग्निशामक दलाचे जवान, ट्रॅफिक पोलीस आणि कुरिअर सर्व्हिसचे कामगार यांची उदाहरणे घेणे महत्त्वाचे ठरते. या व्यक्ती स्वतःच्या कुटुंबासोबतच इतरांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा ठरतात. कोणताही ऋतू असो, मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कडाक्याची थंडी. प्रत्येक दिवशी ही माणसे आपली भूमिका जबाबदारीने निभावतात आणि म्हणूनच सामान्य माणसे स्वतःचे जीवन उत्साहात जगू शकतात.

आपल्या देशाचे जवान वर्षानुवर्षे, प्रत्येक सेकंदाला सीमेवर आपले रक्षण करतात. प्रत्येक ऋतू झेलत ते आपले कार्य करतात. त्यात कोणी कोणाचा मुलगा असतो, पती असतो, वडील असतो, तर कोणी भाऊ असतो. येणाऱ्या संकटांना स्वतःच्या खांद्यावर घेत, प्राणांची बाजी लावून हे जवान आपले रक्षण करतात. त्यानंतर पोलीस अधिकारी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक, ज्यांच्यामुळे समाजात शांतता आणि समभाव नांदतो. त्यांच्यामुळे अत्याचार होणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळतो. देशाची आणि राज्याची सामाजिक परिस्थिती त्यांच्यामुळेच सुरक्षित राहते. रात्रंदिवस पोलीस अधिकारी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यरत असतात. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता ते गुन्हेगारांना शोधून शिक्षा देतात. त्यांच्यामुळेच सामान्य माणूस आपल्या गावात सुखी जीवन जगू शकतो.

आगीची एखादी घटना कळताच धावून येणारे आपले जिवाभावाचे मित्र म्हणजे अग्निशामक दलाचे जवान. दिवस असो वा रात्र, एक फोन करताच ते क्षणात पोहोचतात आणि आपल्या जिवाची बाजी लावून आग विझवतात. हे जवान केवळ आगच विझवत नाहीत, तर वादळवाऱ्यात पडलेली मोठी झाडे कापून रस्ता मोकळा करतात. विहिरीत पडलेले एखादे मांजर, कुत्रा, गाय किंवा बैल असो, आपला जीव धोक्यात घालून हे जवान मुक्या प्राण्यांच्या मदतीलाही धावून जातात. माणसांसोबतच पशु-पक्ष्यांच्या सुरक्षेचीही ते काळजी घेतात. त्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावणारे ट्रॅफिक पोलीस! त्यांच्याशिवाय रस्त्यावरील वाहतूक शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. आज वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अशा वेळी ट्रॅफिक पोलीस नियमांचे पालन करून घेतात, त्यामुळेच आपण सुरक्षित प्रवास करू शकतो. उन्हातान्हात, पावसात उभे राहून हे कर्मचारी आपली सुरक्षा सुनिश्चित करतात.

आज आधुनिकीकरणाच्या युगात लोकांचे राहणीमान 'डिजिटल' झाले आहे आणि त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. यात महत्त्वाचे कार्य करतात ते म्हणजे कुरिअर सर्व्हिसचे कामगार. सकाळपासून रात्रीपर्यंत ते घराघरांत पार्सल पोहोचवतात. ऊन, वारा, पाऊस आणि प्रसंगी घरातील कुत्र्यांचाही सामना करत ते आपली जबाबदारी पार पाडतात. आपल्या कष्टाने इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून, संध्याकाळी कष्टाच्या पैशांनी ते आपल्या कुटुंबासोबत सुखाचे क्षण व्यतीत करतात.

एकूणच पाहिले तर, या वेगवान दुनियेत प्रत्येक माणूस जितक्या जिद्दीने स्वतः कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, तितक्याच जबाबदारीने तो दुसऱ्याच्या जीवनाचा महत्त्वाचा अंश बनतो. त्यामुळेच, आज समाज एकमेकांच्या साथीने पुढे जाताना दिसतो.

म्हणूनच, या प्रत्येकाप्रती आपल्या मनात आदर आणि ममता असली पाहिजे. कारण, आपल्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कार्य करणाऱ्या या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीचे ऋण फेडणे कठीण आहे.

अशा सर्व कष्टाळू व्यक्तींना आणि स्वतःसोबतच इतरांचा विचार करणाऱ्या या वीरांना कोटी-कोटी प्रणाम!


- पूजा भिवा परब

पालये, पेडणे-गोवा.