महाराष्ट्रातील तळेखोल ते गोव्यातील डिचोली असा प्रवास करणाऱ्या 'डिचोली नदीचा' हा जीवनप्रवास. सामाजिक सलोखा, ऐतिहासिक खुणा आणि निसर्गसंपन्नतेचा वारसा जपणारी ही नदी म्हणजे संस्कृतीचा वाहता दस्तऐवज आहे.

महाराष्ट्रातील तळेखोलच्या फुलडोंगरवर तिचा जन्म होतो आणि मग ती वळणे-वळसे घेत आई गावात येते. नवदुर्गेच्या सान्निध्यात राहून सण-उत्सवांना प्रेरणा देत ती कुडचिरे गावात पोहोचते. कधीकाळी महाराष्ट्रातून गोव्यात येण्यासाठी घाटमाथ्याचा पायवाटांचा वापर करून डिचोलीत येणारे पांथस्थ याच मार्गे येत असत. त्यावेळी त्यांची तहान भागविणारी ती हीच नदी! ती पुढे डिचोलीत प्रवेश करते आणि सर्वजण तिला 'डिचोली नदी' म्हणूनच ओळखू लागतात. एखाद्या प्रदेशाची जीवनवाहिनी नदी त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाला जन्म देते. संस्कृतीला आपल्या काठावर रुजवते, फुलवते आणि वाढवते. त्यातूनच त्या प्रदेशाची स्वतःची अशी खास ओळख निर्माण होते.
लोकमानसाने नदीला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान देऊन तिला पवित्र मानले आहे. पूर्वी व्यापार-उद्योगाच्या निमित्ताने लोक जेव्हा चालत कुडचिरे मार्गे डिचोलीत यायचे, तेव्हा तिथे असलेली आदिम जमात त्यांना त्रास करायची. पुढे सर्वांनी मिळून त्यांचा निःपात केला. त्यांना जेथे पुरले, ती 'बारा जणांची राय' आजही त्या कटू आठवणी उराशी कवटाळून उभी आहे. येथे सातेरी, केळबाय आणि ब्राह्मणी देवीची मूर्ती होती. ती मूर्ती उचलून दुसरीकडे ठेवून तिथे एक सुंदर मंदिर बांधायचे ठरले. बऱ्याच जणांनी ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. तिथे त्याच गावातील 'च्यारी' येतो, त्याचेही प्रयत्न निष्फळ होतात. मात्र, तो देवीचा निस्सीम भक्त होता. तो स्वतःचे काळीज फाडतो, त्यात देवीची मूर्ती ठेवून तो पुढे पाऊल टाकतो; मात्र एकाएकी कोसळून तेथेच गतप्राण होतो. ही आठवण नदी वर्षानुवर्षे आपल्या उरात जपत आहे.
ती डिचोलीत येते आणि शहराशी समरस होते. किती कुळागरांची आणि शेताभातांची ती पोशिंदी होते, याची गणतीच करता येत नाही. तिच्याच पाण्याचा साठा खोल खोल डोह होतो. हा डोह फक्त पाण्याचा नसून लोकमानसाच्या भक्तीचा आहे. या डोहानेच त्यांना जगवले आणि त्यांची कुळागरे पोसली. येथेच नदीकाठी 'पिराची कोंड' आणि 'लिंगाची कोंड' आहे. हिंदू-मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनून त्या भक्तांच्या श्रद्धेला आश्वस्त करतात.
नदीकाठावर दोन्ही बाजूंनी माडांच्या रांगा आहेत. एकेकाळी या जागी माडांच्या झाडांचे सुंदर नेपथ्य दृश्य होते, याच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात. डिचोलीतील या अत्यंत रमणीय जागेत 'जंगली पीर बाबा' येऊन स्थायिक झाले. एका बाजूला पीर बाबा तर दुसऱ्या बाजूला अदुरशा पीर यांचे वास्तव्य या भूमीला धार्मिक अधिष्ठान देणारे ठरले. हा भाग एकेकाळी खूप गजबजलेला होता. महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणाऱ्या रामघाटाच्या खुणाही येथेच आढळतात. दोडामार्ग, लाडफे, डिचोली असा प्रवास करत यात्रेकरू व व्यापारी येत असत. त्यावेळी या डिचोली नदीनेच त्यांना चैतन्याची रसद पुरविली होती.
डिचोलीत त्याकाळी अरब आणि मुर लोकांची वस्ती होती. या शहराने अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक दस्तऐवज जतन करून ठेवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत शिवोपासनेला अनन्यसाधारण महत्त्व होते. जांभ्या दगडावरचे शिलालेख, लिंगाची कोंड आणि पिराची कोंड यांसारखी स्थाने तहानलेल्यांसाठी अमृतकुंभ ठरली आहेत. आजच्या लिंगाची कोंड परिसरात शिवलिंग सापडले. तेथील गुंफा प्राचीन काळी येथे ध्यानधारणा होत असल्याचा पुरावा देतात. भगवान शंकर आणि संत-महंतांचे वास्तव्य येथील निसर्गाने अनुभवले आहे. येथील समृद्ध जंगल मंत्रध्वनींनी गुंजून गेले होते. ऋषीमुनींच्या आणि साधुसंतांच्या तपसाधनेने येथील कणन् कण पुलकित झाला होता.
हा परिसर मनाला एवढी भुरळ घालतो की सुफी तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी 'जंगली पीर' येथे आले आणि नदीकाठी वास्तव्य केले. तेथील पाण्याचा स्रोत 'पिराची कोंड' म्हणून अजरामर झाला. विविध समाज येथे गुण्यागोविंदाने नांदत होते. पुढे काही कारणाने मतभेद होऊन संघर्ष झाले, परंतु स्थानिक लोकात समन्वय निर्माण करण्याचे काम जंगली पीर बाबांनी केले. पूर्वी निघणाऱ्या ताबुताच्या मिरवणुकीची हीच नदी साक्षीदार होती. या ताबुताचे विसर्जन येथेच नदीत व्हायचे. विसर्जन जेथे होत होते, त्याच्या उजव्या काठावर 'लिंगाची कोंड' तर डाव्या काठावर 'अदुल शहा दर्गा' होता. लिंगाच्या कोंडीचा नितळ प्रवास भगवान शंकराच्या भक्तीने आजही गजबजतो. विशेष म्हणजे, ज्या जागेत ही 'लिंगाची कोंड' आहे ती जागा मुस्लिम धर्मीयांची आहे. हा धार्मिक सलोखा या भूमीच्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती देतो.
नदीचा हा प्रवाह अशा परंपरा आणि इतिहास कवेत घेऊन निरंतर वाहत आहे.

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)