
पुण्यातल्या विहारकुंज सोसायटीत नील नावाचा खट्याळ, गोड मुलगा राहायचा. शाळा, खेळ, चित्रं काढणं, प्रश्न विचारणं अशा स्वभावाचा नील आता दहा वर्षांचा झाला होता. सोसायटीत बरीच मुलं होती. सगळे मिळून मैदानात क्रिकेट, पकडापकडी, सायकलची शर्यत असे खेळ खेळायचे. नीलचा ग्रुप तर सगळ्यात प्रसिद्ध होता.
ही सोसायटी खूप छान होती. हिरवीगार झाडं, छोटंसं बागेसारखं मैदान, लहान मुलांसाठी झोपाळे, स्लाईड्स; पण एकच मोठा त्रास सगळ्यांना वाटायचा, तो म्हणजे गेटजवळचा विचित्र स्पीडब्रेकर. इतका उंच आणि वाकडा होता की गाडी, स्कूटर, सायकल काहीही त्यावरून नीट जात नसे. लोक त्यावर अडखळत असत, तर कधी कधी पडतही.
एका रविवारची गोष्ट. नील, त्याची मैत्रीण सायली आणि मित्र तनय यांनी सायकलची शर्यत लावली.
“तयार एक, दोन, तीन झूम!” तनय ओरडला.
सगळे जोरात पॅडल मारत निघाले. गेटकडे जाताना नील अगदी पुढे होता. तो ओरडला, “बघा, मी जिंकणार! हा हा हा!”
पण पुढच्याच क्षणी धाडकन्ss! त्याची सायकल स्पीडब्रेकरवरून इतकी उडाली की तो धपकन् खाली पडला. त्याचा गुडघा खरचटला. सायली आणि तनयला हसू आलं.
“अरे नील, तू तर धावण्याऐवजी उडण्याची प्रॅक्टिस करतोयस!” तनय चिडवत म्हणाला.
नीलला तर रडूच आलं. पण तोही हार मानणाऱ्यांतला नव्हता.
“या स्पीडब्रेकरमुळे मी पडलो. किती उंच, मोठा आहे हा! याचं काहीतरी करायला पाहिजे,” तो म्हणाला.
दुसऱ्या दिवशी तनयच्या बाबांची स्कूटर त्याच ब्रेकरवर आपटली. ते खाली पडता पडता वाचले.
“अरे देवा! हा स्पीडब्रेकर की पर्वत!” ते ओरडले.
सायलीच्या आजोबांची तर फार पंचाईत व्हायची.
“गुडघे दुखतात, तरी हा डोंगर चढावा लागतो. हे कसले इंजिनिअर आहेत?” ते रागावून म्हणायचे.
सोसायटीतील सगळेच जण रोज कुरकुर करायचे, पण कोणी ठोस पाऊल उचलत नव्हते.
नील, सायली, तनय आणि बाकी मुलं एकत्र जमली. सायली म्हणाली, “आपणच काहीतरी करायला हवं. मोठ्यांना हा प्रश्न कळलाच नाही असं दिसतं.”
“पण आपण लहान ना ते आपलं ऐकतील का?” संजूने घाबरत विचारलं.
नील म्हणाला, “आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू. बघू तरी काय म्हणतात ते. चला, पोस्टर्स बनवूया!”
सगळ्या मुलांनी आपापल्या वहीतून रंगीत कागद कापले. कोणी चित्रं काढली – एक मोठा डोंगरासारखा ब्रेकर, त्यावर पडणारे लोक. कोणी वाक्यं लिहिली:
“आम्हाला खेळायला त्रास होतो.”
“स्पीडब्रेकर छोटा करा.”
“सायकल चालवताना आम्हाला त्रास होतो!”
ते सगळे पोस्टर्स त्यांनी सोसायटीच्या गेटवर आणि नोटीस बोर्डवर लावले. दुसऱ्या सकाळी मोठी मंडळी जॉगिंगला आली. त्यांनी पोस्टर्स वाचले. एक काका म्हणाले, “मुलांनी खरंच छान मुद्दा मांडलाय. आम्हाला सर्वांना त्रास होतो, पण आम्ही काही बोलत नव्हतो.”
हळूहळू सोसायटीच्या आवारात चर्चा वाढू लागली. लोक विचार करू लागले. शेवटी सोसायटी समितीची बैठक बोलावण्यात आली. सगळे सदस्य टेबलाभोवती बसले होते. या बैठकीला नील व त्याच्या ग्रुपलाही बोलावलं होतं. नील पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बैठकीत बोलायला उभा राहिला.
“हा स्पीडब्रेकर आमच्यासाठी अडचणीचा आहे. आम्हाला खेळायला, शाळेत जायला अडचण होते, तसाच त्रास तुम्हालाही होतो ना? कृपया तो स्पीडब्रेकर छोटा आणि कमी उंचीचा करता येईल का?”
सायलीनेही सांगितलं, “मी तर आईसोबत स्कूटरवरून जात असताना एकदा पडणारच होते, पण आईने सावरलं. मी तर गेटबाहेर जाऊन उभी राहते आणि मग स्कूटरवरून जाते.”
सगळ्यांनी मुलांच्या या धाडसाचं कौतुक केलं. समितीचे अध्यक्ष म्हणाले, “छान! मुलांनी आपली अडचण स्पष्टपणे मांडली. आपण लगेच या कामाला सुरुवात करू.”
दोन आठवड्यांत काम सुरू झालं. कामगार आले, जुना उंच स्पीडब्रेकर फोडला. नील आणि त्याचा ग्रुप रोज काम बघायला यायचे. संजू तर म्हणाला, “वा! आपला डोंगर कोसळतोय!”
शेवटी नियमांप्रमाणे योग्य उंचीचा, सुरक्षित ब्रेकर बनला. गाड्या छान हळू जात होत्या, आता कोणीही धडपडत नव्हतं. संक्रांतीचा सण होता. सोसायटीत छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करून नील व त्याच्या ग्रुपला खास धन्यवाद देण्यात आले.
अध्यक्ष म्हणाले, “कधी कधी मोठ्यांकडून काही गोष्टी लक्षात आल्या तरी 'मग बघू, नंतर करू' असं म्हणून पुढे ढकलल्या जातात. पण नील व त्याच्या ग्रुपने योग्य वेळी स्वतः पुढाकार घेऊन या स्पीडब्रेकरचा मुद्दा लक्षात आणून दिला व सर्वांची होणाऱ्या त्रासातून सुटका केली. खूप छान वाटलं मुलांनो.”
सगळ्या मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. नील सायलीला म्हणाला, “बघ, आपण खरंच हिरो झालोय!”
सायली हसून म्हणाला, “हो, आता सायकलची शर्यत पुन्हा सुरू!”

- सौ. मंजिरी वाटवे