
अाई नेहमी म्हणते, “मोबाईल बाजूला ठेव आणि बाहेर खेळायला जा!” आणि आपण लगेच विचार करतो, “अरे देवा! एवढ्या उन्हात?” पण थांबा बरं. तुम्हाला माहीत आहे का? खेळ म्हणजे खरोखरच औषध आहे! हो हो, गोळी नाही, इंजेक्शन नाही; तर धावणं, उड्या मारणं, हसणं, घाम गाळणं हेच ते औषध!
बाहेर खेळताना काय होतं पाहूया?
१. शरीर मजबूत होतं
जेव्हा आपण मैदानात धावतो, फुटबॉल खेळतो, सायकल चालवतो, तेव्हा आपल्या हात-पायांची, स्नायूंची आणि हाडांची ताकद वाढते. आपलं शरीर म्हणतं, “वा! आज छान व्यायाम झाला!” खेळामुळे आपण उंच होतो, तंदुरुस्त राहतो आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
२. मेंदू स्मार्ट होतो.
खेळ फक्त शरीरासाठी नाही, तो मेंदूसाठी पण खूप महत्त्वाचा आहे! खेळताना आपण विचार करतो चेंडू कुठे मारायचा? मित्राला पास कधी द्यायचा? कोण जिंकणार? यामुळे आपला मेंदू झपाट्याने विचार करायला शिकतो. अभ्यासात लक्ष लागायला मदत होते
३. मन आनंदी राहत
कधी कधी राग येतो, कंटाळा येतो, शाळेचा अभ्यास जड वाटतो ना? तेव्हा बाहेर खेळा! मित्रांसोबत हसा, पळा, ओरडा! खेळताना आपल्या मनात आनंदाची फुलं फुलतात ताण, राग, चिंता सगळे पळून जातात!
४. मित्र कसे बनवायचे ते शिकतो
मैदानात आपण एकटे नसतो. आपण टीममध्ये खेळतो. म्हणजे काय?
एकमेकांना मदत करतो
हरलो तरी स्वीकारतो
जिंकलो तरी गर्व करत नाही
खेळ आपल्याला चांगला मित्र आणि चांगला माणूस बनवतो
५. भूक लागते, झोप छान येते
बाहेर खेळल्यावर आई जेवायला बोलावते तेव्हा आपण काय म्हणतो? “आई, खूप भूक लागली आहे!” खेळामुळे भूक चांगली लागते आणि रात्री गोड झोप येते. झोप चांगली आली की शरीरही खुश!
मोबाईल नाही. मैदान हवं!
मोबाईल, टीव्ही, टॅबलेट हे सगळं थोडं थोडं ठीक आहे. पण रोज मैदानावर खेळणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे! कारण
खेळ = आरोग्य
खेळ = आनंद
खेळ = सुपर पॉवर!
म्हणून लक्षात ठेवा.
जेव्हा पुढच्या वेळी आई म्हणेल “बाहेर खेळायला जा!” तेव्हा आनंदाने म्हणा, “हो आई! खेळ म्हणजे माझं रोजचं औषध!”

- डॉ. पूनम संभाजी, बालरोगतज्ज्ञ