हिवाळ्यातील आरोग्यदायी वरदान: गाजर

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
03rd January, 11:18 pm
हिवाळ्यातील आरोग्यदायी वरदान: गाजर

हिवाळ्यात लालसर-केशरी रसरशीत गाजरे बाजारात येतात. ही गाजरे चवीला गोडसर असतात. गाजराचा हलवा, खीर, लोणचे इत्यादी विविध पदार्थ त्यापासून केले जातात. गाजराची कोशिंबीर किंवा सॅलड हे तोंडी लावण्यासाठी केले जाते. गाजर शरीराचे पोषण करते; हृदय आणि डोळ्यांचे आरोग्यसुद्धा गाजराच्या सेवनाने सुधारते.

​गंमत अशी आहे की, गाजर शिजवून त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाता येतात आणि ते कच्चेसुद्धा खाता येते. तुम्हाला कच्चे गाजर चावून खायला आवडते का? कच्चे गाजर चावून खाल्ले असता हिरड्या मजबूत होतात.

​गाजर खाण्याचे फायदे :

१. डोळे तेजस्वी राहतात.

२. मांसपेशी मजबूत होतात.

३. पोटाचे आरोग्य चांगले राहते.

४. जखमा भरून यायलासुद्धा मदत होते.

​ गाजर पचायला जड असल्याने सूर्यास्तानंतर, म्हणजेच रात्री गाजर जास्त प्रमाणात खाऊ नये. अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते.

 बाजारातून आणलेली गाजरे स्वच्छ धुवूनच खावीत.

 गाजराचे गरमागरम सूप मिरपूड व जिरेपूड घालून प्यायल्यास हिवाळ्यात होणारी सर्दी व खोकला कमी होण्यास मदत होते.

 खमंग फोडणी दिलेली गाजराची भाजीसुद्धा चविष्ट लागते. तोंडी लावण्यासाठी गाजराच्या लांबट फोडी करून, त्यात लिंबाचा रस घालून केलेले चटकदार लोणचे जिभेची चव वाढवते.

 साजूक तुपात परतून काजू-बदाम घालून केलेला गाजराचा हलवा तर हिवाळ्यात विशेष असतो. गाजराचा हलवा शरीराचे पोषण करणारा आणि वजन वाढवणारा आहे.

 गाजराची कोशिंबीरसुद्धा चविष्ट लागते; तसेच गाजराचे लुसलुशीत पराठे आणि खुसखुशीत पुऱ्या हे पदार्थसुद्धा थंडीच्या दिवसात खाण्यास योग्य आहेत.

 गाजर घालून केलेला 'कॅरट केक'सुद्धा कधीतरी खाऊन बघा. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, खूप क्रीम व साखर घातलेले मैद्याचे केक खाण्यापेक्षा, गाजर व रवा घालून केलेला कॅरट केक पचायला हलका आणि आरोग्यदायी आहे.

​असे पौष्टिक व चविष्ट पदार्थ खाल्ले, तर तुम्ही पिझ्झा आणि चिप्ससारखे पॅकेज्ड पदार्थ विसरून जाल आणि निरोगी व्हाल.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य